Friday, September 26, 2025

‘बुडता’ पंजाब

‘बुडता’ पंजाब

निसर्गाशी प्रतारणा केल्यास काय होते, हे मराठवाडा, विदर्भापासून थेट-काश्मीरपर्यंत पाहायला मिळाले. हिमालयाजवळील अनेक राज्ये या वर्षी ढगफुटीपासून भूस्खलनापर्यंतच्या घटनांनी बेजार झाली. पंजाब आणि हरयाणा ही राज्ये तर पूरग्रस्त झाली. याचे गांभीर्य इतके आहे की, सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीच्या वेळी पूरग्रस्त राज्यांना नोटीस पाठवून निसर्गाच्या छेडछाडीबाबत स्पष्टीकरण मागितले गेले.

पंजाबमध्ये पुरामुळे आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला. २३ जिल्ह्यांमधील १९०२ हून अधिक गावे पाण्याच्या विळख्यात आहेत. ३ लाख ८४ हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. पूरग्रस्त लोक आणि गावांमधील प्रशासन यांच्यात थेट संपर्क स्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रत्येक बाधित गावांमध्ये एक राजपत्रित अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून आढावा घेतला. हिमाचलच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे भाक्रा धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे व्यवस्थापनाने चारही पूर दरवाजे ९-९ फुटांनी उघडले. पंजाबमधील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. गेल्या तीन दशकांमध्ये असा पाऊस आणि पूर कुणी पाहिला नव्हता. गेल्या आठवड्यापासून संपूर्ण पंजाब पुरात पोहत असल्यासारखे चित्र आहे. अलीकडच्या काळात भाक्रा धरणात एक लाख क्युसेकहून अधिक पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाण्याची पातळी १६७९ फुटांवर पोहोचली आहे. या काळात टर्बाइन आणि दरवाजांमधून ८५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सतलज नदीच्या काठावरील खालच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे हर्ष बेला, पट्टी दुचाली, पट्टी टेक सिंग, संसोनवाल, एल्गारा, बेला ध्यानी, बेला ध्यानी लोअर, बेला रामगढ, शिव सिंह बेला, प्लासी, सिंगपुरा, जोहल, तरफ मजारी, भालन, कालित्रा, दादोली लोअर आणि दाबखेडा या भागात धोका वाढला. यामुळे ही देशभरातील मोठीच घडामोड बनली.

या काळात लुधियानामध्ये धरण कमकुवत झाले. हे कळताच कॅबिनेट मंत्री हरदीप सिंग मुंडियन आणि उपायुक्त हिमांशू जैन यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. त्यानंतर सैन्याला पाचारण करावे लागले. संपूर्ण गाव आणि आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला. सासराली कॉलनी परिसराचा ताबा सैन्याने घेतला. त्यांच्यासोबत एनडीआरएफची टीमही घटनास्थळी नियुक्त करण्यात आली. प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली. लुधियानामध्ये प्रशासनाने नदीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना सतर्क केले आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पंजाबच्या दोन हजार कोटींच्या मदत पॅकेजबाबतच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला. चक्की खडमध्ये धूप झाल्यामुळे पर्वत कोसळू लागले आहेत. पंजाबला आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले आहे. जवळपास दीड हजार गावे पाण्याखाली गेली आहेत. लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. पंजाबपासून पाकिस्तानपर्यंत सतलज, चिनाब आणि रावी नद्यांनी कहर केला आहे. यामुळे या भागात इतका पाऊस का पडत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. हवामानशास्त्रज्ञांनी याचे सविस्तर उत्तर दिले आहे. हवामान विभागाचे म्हणणे आहे, की बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळ हवेत आणि आर्द्रतेत वाढ करतात. त्यामुळे मुसळधार पाऊस पडतो. ऑगस्टच्या उत्तरार्धात अशा चार प्रणाली सक्रिय होत्या. त्याचा परिणाम अजूनही सुरू आहे.

पावसाळ्यात, बऱ्याचदा लांब अंतरासाठी कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. हवामानशास्त्राच्या भाषेत त्याला मॉन्सून ट्रफ म्हणतात. पश्चिमी विक्षोभामुळे ऑगस्टमध्ये पंजाबमध्ये पाच वेळा मुसळधार पाऊस पडला. यामध्ये बंगालच्या उपसागरापासून वायव्य राज्यांमध्ये घड्याळाच्या उलट दिशेने वाऱ्याची हालचाल दिसून आली. जुलै-ऑगस्टसारख्या मॉन्सून महिन्यांमध्ये सहसा पश्चिमी विक्षोभ सक्रिय नसतात; परंतु यावेळी हा अपवाद ठरला. इराणभोवती स्थिर वारे वाहत असल्याने हा विक्षोभ दक्षिणेकडे म्हणजेच भारताकडे ढकलला गेला. त्यामुळे जम्मू-काश्मीरसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. भूस्खलन आणि पूर यांसारख्या घटनांचा धोका कायम राहील. आतापर्यंत संपूर्ण देशात मान्सून हंगामात सुमारे ६ टक्के जास्त पाऊस पडला आहे, तर पूर्वेकडील भाग कोरडे राहिले आहेत. सहसा, पूर्व भारतात चांगला पाऊस पडतो; परंतु यावेळी उलट घडले. वायव्य भाग सर्वाधिक प्रभावित झाला. तिथे आतापर्यंत २७ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंजाब सरकारने संपूर्ण राज्य आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले आहे. बाधित सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्व विभागांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये १९८८ नंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली. रणजित सागर धरणावर काम करणाऱ्या कामगारांच्या मते असा पूर पहिल्यांदाच पाहायला मिळाला. धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच सर्व सात दरवाजे उघडावे लागले.

येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार १९८८ मध्ये पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि बिहारमध्ये आलेला पूर हा त्या वर्षीच्या चार सर्वात विनाशकारी हंगामी घटनांपैकी एक होता. याशिवाय, पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ आले, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तीव्र उष्णता अनुभवायला मिळाली आणि दुरुस्तीच्या कामासाठी कमी वेळ उपलब्ध झाला. जम्मू आणि काश्मीरमध्येही जोरदार हिमवृष्टी झाली. पंजाबसह वायव्य भारतात ऑगस्टमध्ये २६५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. तो २००१ नंतरचा सर्वाधिक आणि १९०१ नंतरचा तेरावा सर्वाधिक पाऊस आहे. १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान पंजाबमध्ये ४४३ मिलिमीटर पाऊस पडला. तो संपूर्ण मॉन्सून हंगामातील सरासरी पावसापेक्षा आधीच जास्त आहे. भाक्रा धरणाची पाण्याची पातळी आणखी वाढली, तर दरवाजे उघडावे लागतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. भाक्रा धरणाची पाण्याची पातळी १६७८.९७ फुटांवर पोहोचली आहे. ती १६८० फूट या धोक्याच्या चिन्हापेक्षा फक्त एक फूट कमी आहे. त्यामुळे संपूर्ण पंजाबमध्ये धोक्याची घंटा वाजू लागली आहे. पोंग धरणदेखील १३९० फूट धोक्याच्या चिन्हापेक्षा १३९४.५१ फूट वर असल्यामुळे खालच्या भागात आणखी पूर येण्याची शक्यता वाढली. फिरोजपूर आणि फाजिल्का येथे परिस्थिती विशेषतः गंभीर राहिली.

भारतात मॉन्सून हा नेहमीच शेती आणि शेतकऱ्यांचे भवितव्य लिहिणारा हंगाम राहिला आहे. तो केवळ पावसाळाच नाही तर, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जो धान्याचे साठे भरतो आणि लाखो शेतकऱ्यांच्या घरात आशा निर्माण करतो; पण आशेचा हा हंगाम कधी कधी विनाशाचे कारण बनतो. या वर्षीचा मान्सून तसाच ठरला. यावेळी मन्सूनचे आगमन लवकर झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; परंतु अतिवृष्टीमुळे हे वर्ष त्यांच्या आशा धुळीस मिळवणारे ठरेल, असे चित्र दिसू लागले. भारतातील कृषीक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा या प्रमुख कृषी राज्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

खरीप हंगामातील पिकांना, विशेषतः भात आणि कापूस यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पंजाब, बिहार, उत्तर प्रदेशसारख्या प्रमुख भात उत्पादक राज्यांमध्ये भात पीक नष्ट झाले आहे. पंजाबमधील बहुतेक जिल्हे धान्याचे कोठार आहे. ते पुरामुळे प्रभावित झाले आहेत. भात पिके ५ ते १० सेंटीमीटर पाण्याच्या खोलीत चांगली वाढतात. पाणी १५ सेंटीमीटरपेक्षा जास्त काळ खोलीवर राहिल्यास उत्पादन कमी होऊ लागते. पुरामुळे पाणी साचल्यास खरीप हंगामातील पिके अनेक रोगांना बळी पडतात. पिकांची मुळे कुजू लागतात. झाडांमध्ये बुरशी वाढू लागते. पंजाबच्या २३ पैकी १२ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. लाखो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात, कापूस आणि मक्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. राज्यातील बहुतेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे ७५ ते ९० टक्के नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाचा भाजीपाला आणि नगदी पिकांवरही परिणाम झाला.

- अजय तिवारी
Comments
Add Comment