Thursday, September 25, 2025

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा हुकला

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा हुकला

मनसेचं 'वैभव' भाजपला केव्हा फळणार?

मुंबई : नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी मराठीत म्हण आहे. वैभव खेडेकर यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत असंच काहीसं घडतंय. मनसेतून बडतर्फ झालेले कोकणातील नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश दोनदा लांबणीवर पडलाय. २५ ऑगस्टला मनसेने त्यांना बडतर्फ केले आणि शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी मुंबई गाठले, पण प्रवेश झाला नाही. काय आहे या मागची राजकीय खेळी? कोकणातील राजकारणावर कसा परिणाम होईल? कोकणात मनसेला कसा फटका बसेल? भाजपला काय फायदा होईल?

महाराष्ट्रात सध्या कोणता नेता, कोणत्या पक्षात, कधी प्रवेश करेल याचा नेम नाही आणि भविष्यही सांगता येत नाही. आता मनसेने बडतर्फ केलेल्या वैभव खेडेकर यांचंच उदाहरण बघा. त्यांचा भाजपमधील प्रवेश दोन वेळा हुकला. मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी खेडेकरांची बडतर्फी जाहीर केली. त्यानंतर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार होता. नितेश राणे यांची भेट घेतल्याने कोकणातील भाजप नेत्यांचा पाठिंबाही होता, मात्र दोन वेळा पक्षप्रवेश हुकल्याने शंकेची पाल चुकचुकायला लागलीय.

?si=RFaV8hnHPwvSmSx-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला कोकणात पक्ष मजबूत करायचा आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला. मात्र ओबीसी आणि मराठा आंदोलनामुळे ४ सप्टेंबरचा पहिला मुहूर्त हुकला. त्याच वेळी भाजप नेते नारायण राणे यांच्या तब्येतीचं कारणही पुढे करण्यात आलं. आता मुंबईत भाजप कार्यालयात होणारा पक्षप्रवेशही पुढे ढकलण्यात आलाय.

वैभव खेडेकर यांनी भाजपत प्रवेश केल्यास कोकणातील भाजपला मोठा फायदा होईल, कारण ते खेड नगरपालिकेत एकहाती सत्ता असलेले नेते आहेत. मनसे कार्यकर्ते भाजपकडे वळल्याने भाजपची कोकणातील पकड मजबूत होऊ शकते. दुसरीकडे खेडेकरांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.

वैभव खेडकर यांनी २० वर्ष मनसेचं काम केलंय. खेड नगराध्यक्ष म्हणून विविध विकास प्रकल्प राबवले. रस्ते आणि पाणीपुरवठा यासारख्या योजना राबवल्या. त्यामुळे ज्या पक्षासाठी २० वर्ष जीवाचं रान केलं, एकनिष्ठ राहिलो, त्याच पक्षाने बडतर्फी करून निष्ठेचे फळ दिलं, अशी दुखरी भावना खेडेकर यांनी व्यक्त केलीय. इतकंच नव्हे तर मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असंही ते म्हणाले. त्यानुसारच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईच्या भाजप कार्यालयात पक्षप्रवेश होणार होता. शक्तिप्रदर्शनासाठी त्यांनी शेकडो कार्यकर्तेही मुंबईत आणले होते.

वैभव खेडेकर यांनी भाजपत प्रवेश केल्यास रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची जवळपास १५ टक्के मतं भाजपकडे वळू शकतात. मात्र आता उत्सुकता वाढलीय ती खेडेकरांचा पक्षप्रवेश लांबणीवर का पडतोय याची? त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त का हुकतोय ? मनसेत त्यांनी २० वर्षं काम केलं तरी गेल्या १० वर्षात त्यांची राजकीय पीछेहाट होत असल्याची चर्चा आहे. मात्र वैभव खेडेकर यांनी आपण भाजपसाठी दुप्पट ताकदीने काम करणार असल्याचं म्हटलंय. गल्लीबोळातील कार्यकर्ता असलो तरी कोकणात कमळ फुलवण्याचा निश्चय त्यांनी बोलून दाखवलाय. एकूणच आता वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश केव्हा होणार, याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांसह कोकणवासीयांचं लक्ष लागलंय.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >