
मराठवाड्यासह विदर्भात अस्मानी संकट आणखी गडद होणार
मुंबई : पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच जाता-जाता पुन्हा एकदा पाऊस मोठा दणका देणार असल्याचा या भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. १५ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. येत्या १२ ते १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून भारतातून पूर्णपणे परतेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
२४ ते २७ सप्टेंबर दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील दोन दिवस ओडिशा, आंध्र प्रदेश, आणि झारखंडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रालादेखील हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यंदा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला आहे, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२९ सप्टेंबरपर्यंत धोक्याचा इशारा
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने पीक आडवे झाले असून शेतकऱ्यांची स्वप्न पुरासोबत वाहून गेली. एरवी पाण्याविना करपणारी पिके यंदा पाण्याने करपली आहेत. जनावरे महापुरात वाहून गेली. मागच्या २० वर्षांत पहिल्यांदाच इतकी भीषण परिस्थिती मराठवाड्याने पाहिली. २९ सप्टेंबरपर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.