
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. टोलच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे आणि गडकरींनी हा टोल जनतेवर लादला आहे, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. टोलमधून मिळालेला पैसा 'आयडीएल' नावाच्या कंपनीत गेला आणि तिथून तो नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला, असा थेट आरोप दमानिया यांनी केला आहे. दमानियांच्या या आरोपांना नितीन गडकरी यांनी अद्याप थेट उत्तर दिलेले नाही.
इथेनॉल संदर्भात दमानिया यांनी गडकरींच्या कंपन्यांच्या जाळ्यावर बोट ठेवले आहे. इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या आहेत. प्रत्येक रस्त्याशी संबंधित कामात येनकेन प्रकारेण गडकरींशी संबंधित कंपन्या गुंतल्या आहेत. गडकरींनी किमान १२८ कंपन्या स्थापन करुन ठेवल्या आहेत. याच कंपन्यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामांच्या निमित्ताने पैशांची उलाढाल सुरू आहे. या संदर्भातले आर्थिक व्यवहार हाती आले आहेत. योग्य वेळी ते उघड करेन. हे व्यवहार उघड झाल्यानंतर त्यांची पडताळणी करायला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.
नितीन गडकरी केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी देशाची सेवा करण्यासाठी शपथ घेऊन मंत्रिपदाचा स्वीकार केला आहे. स्वतःच्या मुलांच्या कंपन्या उघडण्यासाठी किंवा त्यांना नफा व्हावा म्हणून गडकरींना मंत्रिपदाची जबाबदारी सोपवलेली नाही. पण गडकरींनी पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केला आहे. मंत्रिपदाचा वापर गडकरींनी मुलांच्या कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठीच केला; असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरंतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखलं आहे. कारण गडकरींचे पुत्र दररोज १४४ कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत; असाही आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.