
निती आयोग करणार सिंधुदुर्गातील ‘ए आय’ प्रकल्पाचा अभ्यास - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई : ‘ए आय’ तंत्रज्ञानाने प्रशासन व सुरक्षा व्यवस्था हाताळणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. १ मे २०२५ रोजी पासून जिल्ह्यातील ८ विभागांचे कामकाज कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून सुरू असून याचा अभ्यास करण्यासाठी पुढील महिन्यात निती आयोगाचे पथक येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. मंत्रालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा देशात पहिला ‘ए आय’ युक्त जिल्हा झाल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, यामुळे ग्रामीण जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. ‘ए आय’च्या माध्यमातून नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटक यांची सुरक्षितता निश्चित झाली आहे. तसेच महामार्गावरील अपघात रोखणे, त्याचा तपास करणे, जिल्ह्यातील हत्तींचा प्रश्न मार्गी लावणे शक्य झाले आहे. अनेक प्रलंबित प्रकरणे यामुळे मार्गी लावली जात आहेत. जिल्ह्यातील समस्यांवर उत्तरे शोधली जात असल्याचे राणे यांनी सांगितले.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘ए आय’ मॉडेल याचा अभ्यास आता निती आयोग करणार आहे. हे मॉडेल देशपातळीवर राबवण्याविषयीही निती आयोग अभ्यास करणार आहे. जिल्ह्यातील नगर विकास, परिवहन पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अशा महत्वाच्या विभागांमध्ये सध्या ‘एआय’ तंत्रज्ञान आधारित यंत्रणा सक्रिय आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांनाही हे मॉडेल राबवता यावे यासाठी लवकरच मंत्रालयीन स्तरावर याचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.