
मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
गेल्या लेखामध्ये आपण योगाच्या प्रकारांपैकी मंत्रयोगाविषयी माहिती बघितली. मंत्र अनेक असले तरी विशेष करून योगाशी संबंधित असलेला मंत्र म्हणजे ओम् हा बीजमंत्र. ओंकारसाधना हा योगसाधनेचा भाग आहे. पतंजलींच्या योगसूत्रातही प्रणव म्हणजे ओंकाराचा निर्देश आहे.
प्रस्तुत लेखात आपण ओंकाराविषयी माहिती घेणार आहोत. भारतीय वैदिक साहित्य आणि तत्त्वज्ञानामध्ये ओंकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः उपनिषदांमध्ये ओंकाराचं महत्त्व प्रतिपादन केलं आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार समग्र विश्वाचं नियंत्रण करणाऱ्या सर्वव्यापी परब्रह्मतत्त्वाचं ओंकार हे प्रतीक आहे. परंपरेनुसार ओंकार हा परमेश्वराचा प्रथम हुंकार आहे. ओंकार ब्रह्मदेवाच्या कंठातून बाहेर पडला. त्यातून निर्माण झालेल्या नादमय लहरींतून विश्वाची निर्मिती झाली. म्हणूनच ओंकाराला नादमय ब्रह्म असं म्हटलं जातं.
विश्वातील सर्वांत प्राचीन साहित्यकृती मानल्या गेलेल्या ऋग्वेदात ओंकाराचा निर्देश नाही. मात्र त्यानंतरच्या वैदिक साहित्यात ओंकाराचं महत्त्व वाढलेलं दिसतं. प्रत्येक वैदिक मंत्रापूर्वी ओंकार लावण्याची पद्धत सुरू झाली. ओंकार मंगलसूचक असल्यामुळे कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करताना, ग्रंथलेखनाला प्रारंभ करताना ओम् हे अक्षर योजलेलं दिसतं. ओंकार शब्दाचा व्याख्या आणि व्युत्पत्ती अवति इति ओम् - जो रक्षण करतो तो ओम्. ओंकाराच्या उच्चाराने सांसारिक तापांतून मुक्तता होते. साधकाचं रक्षण होतं म्हणून त्याला ओंकार असं म्हणतात. ओंकाराला प्रणव असंही म्हणतात. प्रणूयते प्रकर्षेण स्तूयते अनेन इति प्रणव: - ज्याच्या योगे उत्तम प्रकारे ईश्वराची स्तुती केली जाते तो प्रणव. प्रणतम् अवति इति प्रणव: नतमस्तक झालेल्याचं जो रक्षण करतो तो प्रणव. ओंकार आणि प्रणव दोन्ही एकच आहेत मात्र ओंकार ही वैश्विक शक्ती आहे. ही शक्ती शरीरामध्ये प्राणांसह स्पंदन करते तेव्हा तिला प्रणव म्हणतात. असं दिसतं की, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर रचल्या गेलेल्या तत्त्वज्ञानात्मक साहित्यात ओंकार हा विषय हाताळला आहे. आपल्या परंपरेमध्ये वैदिक साहित्यापासून ते आत्तापर्यंतच्या संतसाहित्यामध्ये म्हणजेच वेद, उपनिषदं, सहा आस्तिक दर्शनं, भगवद्गीता, पुराणं, संतसाहित्य यांमध्ये ओंकाराचे निर्देश आहेत. पातंजल-योगसूत्रांत ओंकाराचं महत्त्व सांगितले आहे. पतंजलींनी योगसूत्रांत पहिल्या पादात म्हटले आहे 'तस्य वाचक: प्रणव: |’ याचा अर्थ प्रणव हा ईश्वराचा वाचक आहे. म्हणजे ईश्वराचा निर्देश प्रणव अर्थात ओंकाराने केला जातो. प्रणव हे ईश्वराचे प्रतीक आहे. प्रतीकावरून ज्याप्रमाणे मूळ वस्तूचं ज्ञान होतं त्याप्रमाणे ओंकाराची साधना केली असता ईश्वराचं स्वरूप समजतं. पतंजली पुढे म्हणतात ओंकार ईश्वराचं प्रतीक असल्यामुळे ओंकाराचा जप करावा. त्याच्याच अर्थाचं चिंतन करावं. अशाप्रकारे ओंकारसाधना ही पतंजलीच्या मते ईश्वरसाधनाच आहे. ओंकारसाधनेचं फलित उपनिषद्काळापासून ओंकारसाधना पुष्कळ प्रचलित झाल्याचं दिसून येतं त्यामुळे उपनिषदांमध्ये ओंकार साधनेचा प्रभाव वर्णन केला आहे. ओंकारोपासनेनं कामनापूर्ती होते असं उपनिषदं सांगतात. ओंकार हे अक्षर अमृत, भयरहित, आहे. ओंकाराच्या ज्ञानानं देवसुद्धा निर्भय झाले त्यामुळे जो या अक्षराचं स्वरूप जाणून उपासना करतो तो निर्भय होतो, अमृतत्व प्राप्त करतो असं म्हटलं आहे. ओम् हे अक्षर परब्रह्म आहे त्यामुळे ओंकाराला जाणून जो जे इच्छितो ते त्याला प्राप्त होतं असं कठोपनिषदात म्हटलं आहे. योगविषयक ग्रंथांमध्ये ओंकाराचं महत्त्व सांगणारा प्रसिद्ध श्लोक आहे - ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः। कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ।।' बिंदुसहित ओंकाराचं योगी नित्य ध्यान करतात. अशा ‘कामद’ म्हणजे सर्व कामना पूर्ण करणाऱ्या आणि ‘मोक्षद’ म्हणजे मोक्ष देणाऱ्या ओंकाराला नमस्कार असो. ओंकार हा बीजमंत्र आहे म्हणजे केवळ ओंकाराचाही स्वतंत्र मंत्र म्हणून जप करतात; परंतु हा जप करताना ओंकारचं उच्चारण कसं करावं हे अधिकारी व्यक्तीकडून जाणून घेणं आवश्यक आहे.
आजही भारतभर ओंकारोपासना केली जाते. कोणत्याही योगसंस्थेत योगसाधनेचा प्रारंभ आणि शेवट ओंकाराच्या उच्चारणानेच होतो. जाणीव जागृत ठेऊन ओंकाराचं उच्चारण केलं तर ओंकारामुळे निर्माण होणाऱ्या कंपनांचा अनुभव घेता येतो. ओंकाराच्या उच्चारणानं चित्त एकाग्र होतं, मन निर्भय, शुद्ध होतं. सत्प्रवृत्ति वाढीस लागते. मनातील द्वैताच निरसन होतं आणि अभूतपूर्व शांततेचा अनुभव येतो. योगसाधना ही केवळ शरीरापुरती मर्यादित नसून मनोविकास हे योगसाधनेचं मुख्य ध्येय आहे. मनोविकास साधण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे ओंकारोपासना आहे.