
सातही धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरल्याने पुढील वर्षभरासाठी मुंबईकरांची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे. सातही धरणे तुटुंब भरल्याने मुंबईकरांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.
यावर्षी पाऊस चांगला पडला आहे. पाऊस अजूनही बरसत आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं तुडूंब भरली आहेत. मुंबईला अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार तलाव, पवई तलाव, तुळशी तलाव, भातसा तलाव या सात प्रमुख धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ही सातही धरणे आता ९९ टक्के क्षमतेने भरली असल्याने मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.
मुंबईकरांना दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणी लागते. मुंबईतील वाढती लोकसंध्या लक्षात घेता भविष्यात आणखी धरण बांधले जाणार काम सुरू आहे. मुंबईत सध्या २२ हजारांपेक्षा अधिक जलजोडण्या करण्यात आल्या आहेत. पाण्याची जी चोरी होत होती. ती कमी झाली आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, जमिनीखाली गळती शोधून दुरुस्त करणे मोठे आव्हानात्मक काम असते. पालिका प्रशासन तंत्रज्ञानाचा वापर करुन पाणी गळती थांबवत आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही घरण फुल्ल झाल्यामुळे पुढील वर्षापर्यंत मुंबईकरांनी पाण्याची चिंता करू नये, असे पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले.