
पुणे (प्रतिनिधी) : पुणे रेल्वे स्थानकात बॅग स्कॅनर मशीनद्वारे प्रवाशांचे सामान तपासणीवेळी एका तरूणाकडे तब्बल ५१ लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. पोलीस चौकशीमध्ये आरोपीने पैशांबद्दल कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. संबंधित तरुण हा गुजरात राज्यातील असून त्याच्या दोन बॅगेमध्ये पैसे भरलेले होते.
रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) सदर तरुणाला ताब्यात घेतले. तेव्हा, ही रोकड जप्त करून आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. फरीदखान मोगल असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अंब्रेला गेटसमोरील सरकता जिना चढून पादचारी पुलावर बॅगेज स्कॅनर मशीनद्वारे प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरू होती. त्यावेळी फरदीनखानच्या जांभळ्या रंगाच्या बॅगेत ही रोकड आढळली. आरपीएफ निरीक्षक सुनीलकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली एएसआय प्रदीप चौधरी, एएसआय संतोष जायभाये, एएसआय विलास दराडे, एएसआय संतोष पवार, कृष्णा भांगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.