
मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही लाखो भक्तगण नवरात्रोत्सवात येत असतात. या दृष्टीने मुंबादेवी मंदिर ट्रस्टने सर्व तयारी केली आहे. दरवर्षी मुंबादेवी मंदिरात नवरात्रीला होणारी गर्दी पाहता यंदा दुहेरी रांग करण्यात आली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. राजस्थान, गुजरातवरून आलेल्या भाविकांची संख्या अधिक असते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रांग मुंबादेवी मंदिरापासून पायधुनीपर्यंत जाते. सुरक्षितेच्या दृष्टीने या ठिकाणी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पुरुष तथा महिला सुरक्षा रक्षकदेखील या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी २४ तास तैनात करण्यात आले आहेत. मुंबादेवीला येण्यासाठी नागरिक मस्जिद बंदर स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे तिथून येणारे रस्ते फेरीवालामुक्त केलेले दिसत आहेत. आम्ही नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो, असे रणजित पटवा या भाविकाने सांगितले. सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देवीच्या भक्तांची वर्दळ असते, असे राजेश जैन यांनी सांगितले.
मुंबादेवी मंदिर परिसरात दागिना बाजार आणि झवेरी बाजार आहे. या ठिकाणी सोन्या-चांदीचे दागिने घेण्यासाठी लोक येतात व येथे आल्यानंतर आवर्जून मुंबादेवीचे दर्शन घेतात. मंदिराजवळ राजेश जैन यांचा दागिन्यांचा व्यापार आहे. नवरात्रोत्सवात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देवीच्या भक्तांची वर्दळ असते. देवीला नवस देणारे भक्त आमच्या येथे सोन्याची नथ, मुकुट, हात, हार व बांगड्या बनवण्यासाठी ऑर्डर देतात, असे त्यांनी सांगितले.
महालक्ष्मी मंदिरात तगडी सुरक्षा व्यवस्था
मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवादरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सुरक्षेची आणि सोयीची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. यासाठी मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तब्बल ७७ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर आणि बॅग स्कॅनिंगची सुविधा असणार आहे. तसेच भाविकांसाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी भुलाबाई देसाई मार्गावर एक मोठा मंडप उभारण्यात आला आहे. इथे दर्शनरांगेची सोय करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आणि आवश्यक वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका देखील उपलब्ध असणार आहे. तसेच नवरात्रीच्या काळात मंदिर सकाळी ५:३० वाजता उघडेल. या दरम्यान रात्री १० वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील. या काळात गाभाऱ्यात प्रवेश बंद असला तरी सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या आरत्या निर्धारित वेळेनुसार होतील. तसेच मंदिराच्या सुरक्षिततेची जबाबदारी गावदेवी पोलिसांकडे असेल. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ताडदेव पोलीस काम पाहणार आहेत.