Saturday, September 20, 2025

“काहेको दुनिया बनाई...!”

“काहेको दुनिया बनाई...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

राज कपूर आणि वहिदा रहमान ही जोडी असलेला ‘तिसरी कसम’ हा १९६६ सालचा चित्रपट. दिग्दर्शक होते बासू भट्टाचार्य आणि निर्माते प्रसिद्ध गीतकार शैलेन्द्र. भट्टाचार्यजींना राज कपूर नेहमी चार्ली चॅप्लीनची जी अतिभोळा ‘साधा माणूस’ छाप नक्कल करायचा ती फारशी आवडत नव्हती. ‘तिसरी कसम’मधील एका साध्या, रांगड्या गाडीवानाची भूमिका करताना राज कपूरने ते अतिभोळ्या ‘देशी चॅप्लीनचे’ सोंग बाजूला ठेवावे अशी त्यांची सूचना होती.

सतत गल्ल्याकडे लक्ष असणाऱ्या राज कपूरने मात्र जसा त्याच्या ‘सत्यं शिवं सुंदरम’, किंवा ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये होता तसा काहीतरी ‘मसाला’ टाकावा अशी सूचना शैलेन्द्रला केली. कवीवर्यांना ती न आवडल्याने त्यांनी अर्थातच स्वीकारली नाही.

राजकपूर आणि वहिदा रहमानबरोबर सहकलाकार होते ए. के. हंगल, इफ्तेखार, केस्टो मुखर्जी, आसीत सेन, सी. एस. दुबे, दुलारी असे दिगज्ज आणि स्वत: शेलेन्द्र व अनेक पाकिस्तानी सिनेमात दिसलेली रेहाना चौधरी. संगीत दिग्दर्शन होते त्यावेळच्या सर्वात हिट जोडीचे, अर्थात शंकर-जयकिशन यांचे.

कथा फणीश्वरनाथ ‘रेणू’ यांच्या ‘मारे गये गुलफाम’ या लघुकथेवर आधारलेली. ज्यांनी देवदास (१९५५), सुजाता (१९५९) आणि बंदिनी(१९६३)साठी पटकथालेखन केले त्या नबेंदू घोष यांनीच ‘तिसरी कसम’ची पटकथा लिहिली होती. ‘मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ बासूदांचे सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी आणि सर्वोत्तम गीतकार म्हणून शैलेन्द्र यांचे फिल्मफेयर पारितोषिकासाठी नामांकन झाले होते.

सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटचा (शैलेन्द्र आणि बासुदा) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर ‘मुंबई बंगाल चित्रपट पत्रकारसंघाचा’ सर्वोत्तम नायक-नायिकेचे पुरस्कार राजकपूर आणि वहिदाला मिळाले. पुढे ‘तिसरी कसम’ अभिजात हिंदी चित्रपटांच्या यादीत गेला आणि त्याच्या उच्च दर्जामुळे चित्रपटनिर्मितीच्या पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश झाला.

बैलगाडीवान (राजकपूर) हिरामण एका शेटकडे नोकरीला असतो. एकदा पोलीस गाड्यांना तपासणीसाठी रस्त्यात थांबवतात. गाडीत काळ्याबाजाराचा माल असल्याने हिरामण घाबरतो. बैल सोडवून घेऊन कसाबसा पळून जातो आणि स्वत:शी शपथ घेतो की पुन्हा अशा मालाच्या वाहतुकीत सहभागी व्हायचे नाही.

थोड्या दिवसांनी गाडीतून बांबूच्या मोळ्या घेऊन जाताना त्याची एका टांग्याशी टक्कर होते. टांगेवाले त्याला मारहाण करतात. तेंव्हा बिचारा दुसरी शपथ घेतो की पुन्हा गाडीतून बांबूची वाहतूक करणार नाही.

पुढे योगायोगाने नौटंकी कंपनीत नर्तकीचे काम करणाऱ्या हिराला (वहिदा रहमान) जत्रेच्या ठिकाणी सोडायचे काम त्याच्याकडे येते. प्रवास दूरचा असल्याने वाटेत त्यांच्यात संवाद घडतो. वहिदाचे अप्रतिम सौंदर्य आणि साधेपणा त्याला आवडतो. त्याच्या स्वभावातील भोळेपणामुळे तीही त्याच्या प्रेमात पडते. त्याला आपल्या नौटंकीच्या प्रयोगाचे पास देते. नर्तिका असलेल्या वहिदाला प्रेक्षकांचे अनेक प्रमाद, ठाकूरची वाईट नजर असे सहन करताना पाहून हिरामणचा जीव कासावीस होतो. अतिशय उत्कट अभिनयाने जिवंत झालेल्या या प्रेमकथेचा शेवट मात्र शोकांतिकेत होतो.

फणीश्वरनाथ रेणू यांनी लिहिलेले त्या दोघातले संवाद म्हणजे नकळत घडणाऱ्या निर्मळ रोमान्सचा एक सुंदर नमुना आहे. गाडी हाकताना वेळ काढण्यासाठी हिरामण म्हणत असलेल्या एका गाण्यात हसरत जयपुरी यांनी देवालाच एक प्रश्न विचारला होता, तो प्रत्येकाने मनातल्या मनात का होईना, कधीतरी देवाला विचारलेलाच असतो. मुकेशच्या नितळ आवाजातल्या मनाला लगेच भिडणाऱ्या त्या अजरामर गाण्याचे शब्द होते - ‘दुनिया बनानेवाले, क्या तेरे मनमें समाई, काहेको दुनिया बनायी, तूने काहेको दुनिया बनाई?’ देवा, आम्ही केवळ माती आहोत तर तू या मातीच्या मूर्ती घडवतोस तरी कशाला? हे सुंदर जग, त्यातले किती वेगवेगळे चेहरे, या जगाची ही अखंड चालणारी जत्रा कशाला भरवतोस? त्यात पुन्हा तरुण मनात तू प्रेमभावना उत्पन्न करतोस. तिच्यामुळे जीवाची किती घालमेल सहन करावी लागते! आणि तू मात्र दूर उभा राहून आमचे हाल बघत बसतोस! असा कसा तू आमचा देव? ‘काहे बनाये तूने माटीके पुतले, धरती ये प्यारी प्यारी, मुखड़े ये उजले. काहे बनाया तूने दुनियाका खेला, जिसमें लगाया जवानीका मेला. गुपचुप तमाशा देखे, वाह रे तेरी खुदाई, काहेको दुनिया बनाई, तूने काहेको दुनिया बनाई?’ ‘देवा, मनाच्या विचित्र खेळांनी तुही कधीतरी आमच्यासारखा त्रासला असशीलच ना? तुलाही कधी प्रेमाची तहान काय असते ते जाणवले असेलच की! कुणाच्या प्रेमाची ओढ काय असते, आणि ते प्रेम न मिळण्याचे दु:ख किती वेदनादायी असते ते तुलाही जाणवले असेल ना? तसे पाहिले तर देवाला किती बालिश प्रश्न विचारायचे हे! पण प्रेमात पडल्यावर आणि दु:खात असताना माणसाला काहीही वाटत राहते हेच खरे. म्हणून कवी देवाला विचारतो, ‘तू मानवी मनात प्रेमभावना निर्माणच का केलीस रे? ‘तू भी तो तड़पा होगा मनको बनाकर, तूफां ये प्यारका मनमें छुपाकर, कोई छबी तो होगी आँखोंमें तेरी, आँसू भी छलके होंगे पलकोंसे तेरी. बोल क्या सूझी तुझको, काहेको प्रीत जगाई, काहेको दुनिया बनाई, तूने काहेको दुनिया बनाई?’

खरे तर माणूस प्रेमात पडल्यावरच त्याला जीवनातला खरा आनंद कळतो आणि दु:ख म्हणजे काय तेही समजू लागते. प्रेमाशिवाय जीवनात निखळ आनंद निर्माण होऊच शकत नाही आणि ते नसेल तर इतर कशानेही ती पोकळी भरून काढता येत नाही. म्हणून मग गीतकार हसरत जयपुरीसाहेब देवाला विचारतात, ‘तू आधी आमच्या भेटी घडवतोसच कशाला? दोन जीव जवळ येतात. त्यांच्यात प्रेमाचे नाजूक धागे विणले जातात आणि तू निर्दयपणे ते तोडून टाकतोस! त्या निरागस जीवांची ताटातूट घडवून मोकळा होतोस. त्यांच्या हळव्या स्वप्नांचा विध्वंस करतोस. आधी जन्माच्या गाठी वाटतील अशा भेटी घडवायच्या आणि मग ती नाती निर्दयपणे संपवायची ही कसली तुझी रीत! खरेच कधी कधी तुला विचारावेसे वाटते ‘देवा, तू हे जग निर्माणच कशाला केलेस?’ ‘प्रीत बनाके तूने जीना सिखाया, हसना सिखाया, रोना सिखाया, जीवनके पथपर मीत मिलाये, मीत मिलाके तूने सपने जगाये. सपने जगाके तूने, काहेको दे दी जुदाई, काहेको दुनिया बनाई, तूने काहेको दुनिया बनाई?’ अशा, सर्वांनाच कधीतरी तीव्रपणे जाणवून गेलेल्या भावना, जुने कवी किती नेमकेपणाने टिपत, नेमक्या शब्दात उतरवून एकेका गाण्यात कल्पकतेने गुंफत ते पाहिले आणि आजची गाणी ऐकली की वाटते, अरेरे! किती लवकर, कसे कायमचे संपून गेले ते दिवस!

Comments
Add Comment