Sunday, September 21, 2025

'घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू होणार GST उत्सव'

'घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू होणार GST उत्सव'

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवसापासून अर्थात सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून देशात GST उत्सव सुरू होत आहे. यामुळे आपल्या बचतीत वाढ होईल आणि आवडीच्या वस्तू आणि सेवा खरेदी करता येतील. जीएसटी बचत उत्सव हा देशातल्या सर्व आर्थिक वर्गातील नागरिकांसाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशाला उद्देशून केलेल्या विशेष भाषणात पंतप्रधान मोदींनी सर्वांना सोमवारपासून सुरू होत असलेल्या नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून देशात GST उत्सव सुरू होत असल्याचे सांगितले.

भारतात सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून जीएसटी सुधारणांचा पुढील टप्पा अंमलात येत आहे. या सुधारणांमुळे जीएसटी बचत उत्सव सुरुवात होत आहे. देशातील सर्व आर्थिक वर्गातील नागरिकांना या उत्सवाचा लाभ होणार आहे. जीएसटी सुधारणा भारताच्या विकासगाथेला आणखी गती देतील आणि व्यवसाय सुलभ करतील. यामुळे विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्य समान भागीदार होईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पीएम मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली तेव्हा आम्ही सार्वजनिक हितासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी जीएसटीला आम्ही प्राधान्य दिले. आम्ही प्रत्येक भागधारकाच्या आणि प्रत्येक राज्याच्या चिंता दूर केल्या. सर्वांना सोबत घेऊनच स्वतंत्र भारतात इतकी मोठी कर सुधारणा शक्य झाली.

देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, जीएसटी सुधारणांमुळे प्रत्येक कुटुंबात समृद्धी येईल आणि भारताच्या विकासाच्या गाथेला गती मिळेल. जीएसटी बचत उत्सवामुळे देशातील सर्व आर्थिक वर्गातील नागरिकांना लाभ होणार आहे.

देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी...

जीएसटी कपातीचा निर्णय लागू झाल्याने देशातील ९९ टक्के वस्तूंवर केवळ ५ टक्केच कर आकारला जाणार आहे. यामुळे दैनंदिन वस्तू खरेदी करण्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. आता खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. जीएसटी सुधारणेचा मोठा लाभ लघू, कुटीर, सुक्ष्म उद्योगांना मिळणार आहे. आता भारताचे निर्मिती आणि भारतातच विक्री हे चक्र वेगाने फिरणार आहे. नागरिक देवो भव: हा मंत्र घेऊन वाटचाल करत आहोत. जीएसटी सुधारणा करण्याचा निर्णय देशाला आत्मनिर्भर करण्यासाठीचे मोठे पाऊल आहे.

मेड इन इंडियाचा निर्धार

‘एक राष्ट्र, एक कर’चे स्वप्न साकार होईल. कर चक्रव्यूह एक समस्या होती, परंतु जीएसटी सुधारणांमुळे सर्वकाही सोपे झाले आहे. आज आपल्या दैनंदिन वापरात अनेक गोष्टी या विदेशी आहेत. आपल्याला याची जाणीवही नसते. मात्र आता पुन्हा एकदा आपल्याला स्वदेशीचा नारा द्यावा लागेल. मी स्वदेशात तयार झालेल्या वस्तूच वापरतो असे आपल्या अभिमानाने सांगावे लागेल. तरच देशातील लघू, लघू, कुटीर, सुक्ष्म उद्योगांना चालना मिळेल. देशातील प्रत्येक राज्याचा विकास होईल, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी मेड इन इंडियाचा निर्धार केला.

जीएसटी २.०मुळे विकासाला मिळणार चालना

पूर्वी देशातील कर प्रणाली अत्यंत असंतुलीत होती. मात्र, आम्ही जीएसटीच्या माध्यमातून देशाच्या विकासाला चालना दिली. आता जीएसटीमध्ये कपात करत आर्थिक प्रगतीचा वेग आणखीन वाढवला आहे. देशात गुंतवणूकीची मोठी संधी निर्माण होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

  1. देशात अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू आणि सेवा स्वस्त होणार
  2. भारतात आता पाच टक्के आणि १८ टक्के असे GST चे फक्त दोन टप्पे (स्लॅब)
  3. ज्या वस्तू आणि सेवांवर १२ टक्के GST होता त्या वस्तू आणि सेवांवर पाच टक्के GST लागू होणार, यामुळे संबंधित वस्तू आणि सेवा स्वस्त होणार
  4. ज्या वस्तू आणि सेवांवर २८ टक्के GST होता त्या वस्तू आणि सेवांवर १८ टक्के GST लागू होणार, यामुळे संबंधित वस्तू आणि सेवा स्वस्त होणार
  5. निवडक वस्तू आणि सेवांवरील GST शून्य टक्के केला, यामुळे संबंधित वस्तू आणि सेवा स्वस्त होणार

Comments
Add Comment