
नागपूरकर भोसलेंचा पितृपक्षातील गणेशोत्सव
महाराष्ट्रात भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून तर चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्री गणेशाची स्थापना करण्याची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी याच परंपरेला सार्वजनिक रूप देऊन त्याचा उपयोग स्वातंत्र्य लढ्यातील समाज प्रबोधनासाठी केला होता. ती परंपरा आजही सुरूच आहे. मात्र त्याचवेळी तत्कालीन वऱ्हाड प्रांतात आणि गोंडवनात, म्हणजेच आजच्या विदर्भात पितृपक्षात भाद्रपद कृष्ण चतुर्थीपासून म्हणजेच संकष्टी चतुर्थीपासून तर चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणपती बसवण्याची प्रथा सुरू होती. हा काळ पितृपक्ष म्हणजेच वऱ्हाडी भाषेत हाडपक म्हणून ओळखला जात असल्यामुळे याला हाडपक्या गणपती म्हणून संबोधले जात होते. या सार्वजनिक गणपतीसमोर समाजप्रबोधनाचे कार्यक्रम कमी आणि मनोरंजनाचे थट्टामस्करीचे कार्यक्रम जास्त असा प्रकार असायचा. म्हणून याला मस्कऱ्या गणपती असेही म्हटले जाते. अजूनही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हा हाडपक्या गणेशोत्सव साजरा होतो. तिथे मग रात्र रात्र लावण्यांची मैफल रंगते तर कुठे रेकॉर्ड डान्सचे कार्यक्रम देखील रंगतात. मात्र हाडपक्या किंवा मस्कऱ्या गणपती म्हणून नाही, तर नियमित गणपती मांडण्याची प्रथा आजही नागपूरकर भोसले घराण्यात सुरू आहे. ही प्रथा १७७८ सालापासून सुरू झाली अशी माहिती आजचे राजे मुधोजी भोसले महाराज देतात.
नागपूर हा परिसर पूर्वी गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या अधिपत्याखाली येत होता. बख्त बुलंदशहा यांचे निधन झाल्यावर त्यांच्याच कुटुंबातील एका दासीपुत्राने बुलंदशहा यांच्या विधवेला आणि तिच्या अज्ञान मुलाला बाजूला सारत सत्ता बळकवली. त्यावेळी बुलंदशहा यांचा मुलगा खूप लहान होता. मग राणीने सातारचे छत्रपती शाहू महाराजांकडे मदतीची याचना केली. त्यावेळी रघुजी भोसले आपले सैन्य घेऊन स्वारीवर निघाले होते. त्यावेळी त्यांचा तळ नागपूर जवळ म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात होता. छत्रपती शाहू महाराजांनी रघुजींना राणीच्या मदतीला जाण्याची सूचना केली. त्यानुसार रघुजी आले आणि त्यांनी त्या दासी पुत्राला सत्तेतून बाजूला करत बुलंदशहांच्या लहान मुलाला गादीवर बसवले आणि राज्य कारभार चालवायला सुरुवात केली. या मदतीबाबत बक्षिसी म्हणून राणीने नागपूर, वर्धा, अमरावती असे काही जिल्हे रघुजींच्या स्वाधीन केले होते. तेव्हापासून भोसलेंची एक गादी नागपुरातही स्थापन केली गेली. पहिले रघुजी राजे भोसले नागपूरचे पहिले राजे बनले. रघुजींचेच पुढले वंशज खंडोजी राजे भोसले १७७८ मध्ये बंगालच्या स्वारीवर गेले होते. त्यांना गणपती पूर्वी नागपुरात येऊन कुळाचाराचा गणपती घरी प्रतिष्ठित करायचा होता. मात्र स्वारी आटोपून यायला उशीर झाला. त्यामुळे गणेशोत्सव संपता संपता ते नागपुरात येऊन पोहोचले. घराण्याचा गणेशोत्सव असा खंडित होणे बरोबर नाही, म्हणून खंडोजीराजेंनी राज्यपुरोहितांशी सल्लामसलत केली. त्यांनी पितृपक्षातही गणपती मांडण्यास हरकत नाही असे सांगितल्यामुळे तेव्हापासूनच हा पितृपक्षातील गणेशोत्सव नागपूरकर भोसले यांच्या वाड्यात सुरू झाला. आज गेली जवळ जवळ अडीचशे वर्षे परंपरेनुसार हा उत्सव दरवर्षी साजरा केला जात असतो. दरवर्षी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वाजत-गाजत मिरवणुकीने श्री गणेशाची मूर्ती नागपूरकर भोसले यांच्या वाड्यात म्हणजेच सीनियर भोसला पॅलेसमध्ये आणली जाते. तिथे तिची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना करून पूजन केले जाते. दररोज गणपतीचे पूजन आणि सकाळ-संध्याकाळ आरती होत असते आणि चतुर्दशीच्या दिवशी पुन्हा वाजत-गाजत मिरवणुकीने गणेशमूर्ती नेऊन परंपरेनुसार साखरदरा तलावात तिचे विसर्जन केले जाते. यंदा देखील परंपरेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नागपूरकर भोसले यांच्या वाड्यात श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. राजे मुधोजी भोसले यांनी प्रतिष्ठापना करून मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजन आणि आरती देखील होते आहे. याशिवाय मूर्ती समोर भोसलेंच्या वाड्यासमोरील मोकळ्या पटांगणात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जात असते. त्याला महाल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवतात.
एकूणच हा आगळावेगळा उत्सव गणेशोत्सव म्हणून विदर्भात ओळखला गेला आहे. या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर दररोज हजेरी लावत असतात. यंदा देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दरेकर, संदीप जोशी, शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी प्रभृत्तींसह अन्य मान्यवरांचा वाड्यावर येऊन श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेणाऱ्यांमध्ये समावेश होता. एकूणच यंदा देखील हा गणेशोत्सव तितक्याच उत्साहाने साजरा होतो आहे. त्यामुळे नागपूरकर भोसले घराण्याची ही एक परंपरा अजूनही जनमानसात रुजते आहे हे नक्की. देशभरात गणेशोत्सव साजरा होतो तो शुक्लपक्षात. मात्र कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षात गणेशोत्सव साजरा करण्याची ही परंपरा देशभरात फक्त नागपूरकर भोसले परिवारातच आजही चालू आहे हे विशेष. - अविनाश पाठक