
सिंगापूर : मूळचा आसामचा असलेला लोकप्रिय बॉलिवूड गायक झुबीन गर्ग याचे ५२ व्या वर्षी निधन झाले. सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग दरम्यान झुबीनचे अपघाती निधन झाले. झुबीन बुडत असल्याचे लक्षात येताच त्याला वाचवून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नॉर्थईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी झुबीन सिंगापूरमध्ये आला होता.
झुबीनने ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये गायली आहेत गाणी
आसाममधील जोरहाट येथे जन्मलेल्या झुबीन गर्गने ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आसामी आणि बंगाली संगीत क्षेत्रात तो सुपरस्टार गायक आणि संगीतकार म्हणून ओळखला जात होता. आसामचा रॉकस्टार असे त्याला आदराने संबोधत होते.
बॉलिवूडमध्ये चमकला झुबीन
झुबीनची बॉलिवूडसाठी गायलेली गाणीही गाजली. त्याने २००६ मध्ये 'गँगस्टर' चित्रपटासाठी 'या अली' हे गाणे गायले. या गाण्याने त्याला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. त्याने 'क्रिश ३' सिनेमासाठी 'दिल तू ही बता', 'प्यार के साइड इफेक्ट्स'साठी 'जाने क्या चाहे मन बावरा' यासह अनेक लोकप्रिय गाणी गायली. झुबीनच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाल्याची भावना असंख्य श्रोत्यांनी व्यक्त केली होती.
झुबीनचे सामाजिक कार्य
गाणी आणि संगीत या व्यतिरिक्त झुबीन सामाजिक कार्यातही सक्रियपणे सहभागी होता. सामच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी आणि तरुणांना त्यांच्या प्रादेशिक संगीताशी जोडण्यासाठी त्याने अथक परिश्रम केले.