
मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आहे. दररोज सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत दहा चाकं आणि त्यापेक्षा जास्त चाकं असलेल्या अवजड वाहनांना मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.
दहा आणि त्यापेक्षा जास्त चाकांच्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. गुजरातहून ठाणे आणि जेएनपीटीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची गैरसोय होऊ नये या करिता महामार्गावरील तलासरी, चारोटी, मनोर या ठिकाणी धाबे, हॉटेल आणि सुरक्षित वाहनतळाच्या जागी ही वाहने उभी करून ठेवण्यात येतील. रात्री नऊ नंतर या वाहनांना मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रवास करता येईल. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना अवजड वाहनांसाठीची बंदी लागू होणार नाही. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता महामार्गावर वाहतूक पोलिसांसोबतच खासगी वॉर्डनची नेमणूक केली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर केलेल्या या उपायांना किती यश मिळते याआधारे वाहतूक नियोजनाची पुढील योजना निश्चित केली जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसामुळे पडलेले प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे तसेच रस्ते व्यवस्थित करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि त्याच्याशी जोडलेले अनेक लहान मोठे रस्ते येथे दिवसा अनेकदा वाहतूक कोंडी होते. अवजड वाहनांमुळे ही कोंडी होते आणि हाल होतात अशी तक्रार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर येत होती. या तक्रारीची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांनी या विषयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेअंती काही दिवस प्रयोग म्हणून मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय झाला. या बंदीमुळे स्थानिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल आणि नागरिकांचा त्रास कमी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.