
मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे विशेष आकर्षण ठरला 'खिलाडी' अक्षय कुमार.
अक्षय कुमार आणि कपिल शर्मा यांच्यातील टोमणे, मजेशीर प्रश्नोत्तरं आणि स्टंटमन्सबाबतचा भावनिक क्षण प्रेक्षकांच्या मनाला भिडला. कपिलने उशिरा येण्याबद्दल टोला मारला असता, अक्षयने हसत उत्तर दिलं, “अरे, मला आधी पैसे मिळाले नाहीत!” तर कपिलच्या प्रतिभा की गरज या प्रश्नावर अक्षय म्हणाला, “तुझा शो नेटफ्लिक्सवर आहे, दोन चित्रपट आहेत, कॅफे पण आहे – आता सांग, प्रतिभा जास्त की गरज ?”
या भागात अक्षयच्या धाडसी प्रवृत्तीचीही चर्चा झाली. दिग्दर्शक महेश भट्ट आणि अब्बास-मस्तान यांनी त्याचे स्टंट्सविषयी अनुभव सांगितले. अक्षय म्हणाला, “मी आधी स्टंटमॅन आहे, नंतर अभिनेता.”
कपिलने स्टेजवर बोलावलेल्या स्टंटमन्सना ‘खतरों के खिलाडी’ म्हणून गौरवण्यात आले. अक्षयने त्यांना आपले खरे हिरो म्हटले. अनेक वर्षांपासून अक्षय या स्टंटमन्सच्या जीवन विम्याचे हप्ते स्वतः भरतो, हे सांगताना मंचावर भावनिक वातावरण निर्माण झाले.
शोचा शेवट 'हेरा फेरी ३' च्या धम्माल अंदाजाने झाला. किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक यांनी बाबूराव आणि सुनील शेट्टीच्या भूमिकांमध्ये येत धमाल केली. “बाबूराव का स्टाइल है” या गाण्यावर सर्वांनी एकत्र डान्स करत शोचा गोड निरोप घेतला.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन, ‘देसी बॉईज’ला वाहिलेली ही खास आदरांजली, शनिवार २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता फक्त नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.