Wednesday, September 17, 2025

शरद पवार म्हणजे कट-कारस्थानाचा कारखाना

शरद पवार म्हणजे कट-कारस्थानाचा कारखाना

आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली पुराव्यांसकट पोलखोल, गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

मुंबई : शरद पवार हे महाराष्ट्रातील कट-कारस्थानाचा कारखाना आहे. कारस्थाने कशी रचायची याचा मुख्य कारखाना पवार आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. मारकडवाडीतील भोळ्या जनतेची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेची नाहक बदनामी केल्याबद्दल शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मारकडवाडीचे सरपंच रणजित मारकड, उपसरपंच आबाराजे मारकड, ग्रामपंचायत सदस्य शहाजी वाघमोडे, पवार गटाचे कार्यकर्ते दत्तात्रय मारकड, अभिजित देवकाते, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन माणसे मला भेटायला आली होती, त्यांनी १६० जागांवर मतांमध्ये फेरफार करून निवडणूक जिंकवण्याची गॅरंटी दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. त्याचा आ. पडळकरांनी समाचार घेतला. तुम्ही निवडणूक आयोगावर शंका निर्माण करण्याचं पाप करत आहात. ज्या मारकडवाडी गावात तुम्ही फेरमतदान घेण्याची मागणी केली, त्या गावातील सरपंच आज समोर येऊन हे पवारांनी केलेले कारस्थान होतं, असं सांगत असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.

लोकशाहीत निवडणुका अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. ज्यावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक आयोग, ईव्हीएम मशिनवर विरोधकांनी खापर फोडले. लोकसभेला महायुतीला अपयश आले, परंतु कोणावर टीका टिप्पणी न करता महायुतीच्या नेत्यांनी आपलं कुठे चुकलंय हे लक्षात ठेवून चुका दुरुस्त केल्या. विधानसभा निवडणुकीत मविआ नेते हवेत होते. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला मतदान होईल या भ्रमात होते. लोकसभेला लागलेला निकाल जनतेचा कौल आहे असं ते बोलत होते. मात्र विधानसभेत पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर बोलू लागले, असं त्यांनी म्हटलं.

त्या दोघांना अटक करण्याची मागणी का केली नाही?

देशाच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात विघातक कृत्य करण्यासाठी जर ते दोघे तुमच्याकडे आले होते तेव्हा तुम्ही गृहमंत्र्यांना फोन करून का कळवले नाही? त्या दोघांना अटक करण्याची मागणी तुम्ही का केली नाही. मात्र पवारांनी असे काहीही न करता त्या दोघांना घेऊन ते राहुल गांधींकडे गेले. तेव्हा शरद पवार आणि राहुल गांधी यांनीच मारकडवाडी फेरमतदानाचे कारस्थान रचल्याचा आरोप आ. पडळकर यांनी केला. ज्यांच्या स्मरणशक्तीचे गोडवे गायले जातात त्या पवारांना त्या दोन माणसांची नावे आठवत नाहीत हे सगळेच संशयास्पद आणि हास्यास्पद आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवारांचे पितळ उघडे पडले

मारकडवाडीतील भोळ्या जनतेची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेची नाहक बदनामी केल्याबद्दल शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी केली. ज्या मारकडवाडीत फेरमतदानासाठी आंदोलन झाले तेथील आंदोलनाचे कुटील कारस्थान शरद पवार आणि त्यांच्या हस्तकांचे असल्याचे मारकडवाडीच्या सरपंच, उपसरपंचांनी उघड केल्यामुळे या प्रकरणातील पूर्ण सत्य समोर आले असून शरद पवारांचे पितळ उघडे पडले आहे, असा हल्लाबोलही आ. पडळकर यांनी केला.

आ. पडळकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माळशिरस मधील मारकडवाडीमध्ये मविआच्या उमेदवाराला मिळालेल्या कमी मतांमुळे सैरभैर झालेल्या शरद पवार आणि मविआ नेत्यांनी मारकडवाडीत इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा खोटा बिनबुडाचा आरोप करत राज्यात आणि देशभरात रान उठवले. संविधानाने निर्माण केलेल्या निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर, इव्हीएमवर शंका उपस्थित करण्याचे पाप शरद पवार करत आहेत. विधानसभा निकालाने व्यथित होऊन निकालाचे आणि मविआला मिळालेल्या कमी मतांचे खापर निवडणूक आयोग आणि इव्हीएमवर फोडायचा कुटील डाव शरद पवार, काँग्रेस व विरोधकांचा होता अशी टीका पडळकर यांनी केली.

ग्रामस्थांना बळीचा बकरा करण्याचे काम शरद पवार आणि त्यांच्या हस्तकांनी केले - सरपंच रणजित मारकड

यावेळी मारकडवाडीचे सरपंच रणजित मारकड यांनी फेरमतदानाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामागील सत्य कथन केले. मारकड म्हणाले की, मारकडवाडी ग्रामस्थांना बळीचा बकरा करण्याचे काम शरद पवार आणि त्यांच्या हस्तकांनी केले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना त्यांच्याच गावात अपेक्षेप्रमाणे मतदान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चलबिचल होती. त्यामुळे निकालानंतर मारकडवाडीत राष्ट्रवादी व काँग्रेस विरोधात कुठे कुठे मतदान झाले ते विस्तृत सांगा, अशी विचारणा शरद पवारांच्या टीमने केली.

ग्रामस्थांवर दबाव टाकत खोटे शपथपत्र घेतले. दिशाभूल करीत आम्हाला महायुती आणि निवडणूक आयोगाविरोधात खोटी प्रतिक्रीया देण्यास भाग पाडले असेही त्यांनी स्पष्ट केले. मारकडवाडीत इव्हीएम घोटाळा झाला असा कांगावा करत लोकशाही, निवडणूक आयोग आणि गावाला बदनाम करण्याचा कट केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही या बाबतची वस्तुस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेतला असेही मारकड म्हणाले.

४० वर्षे विकासापासून वंचित असलेल्या गावात महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचा धडाका लावत गावाचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे ‘ज्याचे खावे त्याला द्यावे’ या न्यायाने गावातील अनेक वृद्ध आणि युवा मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. माजी आमदार राम सातपुते यांनी महायुती सरकारच्या काळात कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी दिला. विधानसभा निवडणुकीत पवार गटाच्या उमेदवाराचे पोलिंग एजंट असलेले दत्तात्रय मारकड यांनाच काही गावकऱ्यांनी आपण भाजपला मतदान केल्याचे सांगितले हे आ. पडळकर यांनी निदर्शनास आणले.

Comments
Add Comment