
मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे. गाझियाबादमध्ये झालेल्या या कारवाईत उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (UPSTF) ने मोठी कामगिरी बजावली आहे.
मारल्या गेलेल्या आरोपांची नावे रवींद्र उर्फ कल्लू कहनी, रोहतक आणि अरूण निवासी गोहना रोड, सोनीपत अशी आहेत. दोघेही गँगस्टर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा गँगचे सक्रिय सदस्य होते.
गेल्या आठवड्यात, बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेची जबाबदारी कुख्यात गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीने घेतली होती. ही घटना दिशाची बहीण खुशबू पटानीने कथितपणे एका धार्मिक नेत्यावर केलेल्या टिप्पणीशी संबंधित होती. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, मात्र यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि हल्लेखोरांचा शोध सुरू केला. उत्तर प्रदेश एसटीएफने (UPSTF) या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एसटीएफने गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना गाझियाबादमध्ये गाठले. पोलिसांना पाहताच आरोपींनी गोळीबार सुरू केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि झालेल्या चकमकीत दोन्ही आरोपी ठार झाले.
या एन्काऊंटरनंतर पोलिसांनी पटानी कुटुंबाला सुरक्षा दिली आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेने बॉलीवूड आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.