Tuesday, September 16, 2025

योगाचे प्रकार

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके

मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती आपण पाहिली. प्रस्तुत लेखात इतर काही योगप्रकारांची माहिती आपण पाहणार आहोत.

मंत्रयोग : मंत्रयोग म्हणजे मंत्रसाधनेनं परमतत्त्वाशी एकरूपत्व प्राप्त करणं. मंत्रांमध्ये अनेक प्रकारचे वर्ण असतात. हे मंत्र विविध प्रकारची फळं देतात. मंत्र म्हटल्यानं, मंत्रातील वर्णांच्या शक्तीमुळे त्या त्या मंत्रांची ऋषीमुनींनी, सिद्धपुरुषांनी सांगितलेली फळं प्राप्त होतात. काही मंत्रांमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ महत्त्वाचा असतो. तर काही मंत्रांमध्ये मंत्रातील वर्णांमधून निर्माण होणाऱ्या ध्वनींना महत्त्व असतं. याचाच अर्थ मंत्र शब्दप्रधान किंवा ध्वनिप्रधान असतो. शब्दप्रधान मंत्रांतील शब्दांच्या अर्थाला अधिक महत्त्व असतं. मंत्र म्हणताना हा अर्थ लक्षात घेऊन मंत्र म्हणणं अपेक्षित असतं. याचं उदाहरण म्हणजे 'ओम् नमः शिवाय' हा शंकराचा मंत्र.

ध्वनिप्रधानमंत्रांतील विशिष्ट ध्वनींनी शरीरात कंपनं निर्माण होतात, जी शरीरातील विविध संस्था, ग्रंथी, पेशी यांची कार्यक्षमता वाढवतात. ध्वनिप्रधान मंत्राला अर्थ असतोच असे नाही. याचे उदाहरण म्हणजे क्लीं, ह्रीं हे बीजाक्षर मंत्र.

आधुनिक काळाचा विचार करता मंत्रांद्वारे सिद्धी प्राप्त करणे हा उद्देश नसला तरी मंत्र म्हणताना मनातील अनावश्यक विचार आपोआपच दूर होतात, तसेच बाह्य गोष्टींनी मन विचलित होत नाही आणि मन शांत व्हायला मदत होते.

लययोग : मानवी देह ही ब्रह्मांडाची प्रतिकृती आहे असं मानलं आहे. ब्रह्मांडात ज्याप्रमाणे ग्रह, नक्षत्र, १४ लोक इत्यादी आहेत त्याप्रमाणे संपूर्ण विश्व मानवाच्या शरीरातही आहेत असं मानलं आहे. मानवी शरीरात मूलाधार चक्राजवळ कुंडलिनी नावाची शक्ती आहे. ही शक्ती जागृत करून मस्तकातील सहस्रार नावाच्या चक्रात वास करणाऱ्या शिवरूपाशी त्या शक्तीला संलग्न करणं म्हणजेच शिवाच्या ठिकाणी शक्तीचा लय करणं आणि मुक्ती मिळवणं म्हणजे लययोग. भगवद्गीतेत भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग असे तीन योग सांगितले आहेत. त्यांचं थोडक्यात विवेचन पाहू.

भक्तियोग : भक्तीच्या सहाय्यानं ईश्वराशी एकरूप होणं आणि परमानंदाची प्राप्ती करून घेणं म्हणजे भक्तियोग. भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।। ईश्वरनामाचे श्रवण करणं, कीर्तन करणं, विष्णुचं स्मरण करणं, पाद्यसेवा करणं, विष्णूची अर्चना करणं, वंदन करणं, त्याचं दास्य पत्करणं, त्याच्याशी सख्य करणं, स्वतःच्या मनातील सर्व काही आडपडदा न ठेवता त्याला निवेदन करणं हे भक्तीचे नऊ प्रकार आहेत. ज्याला जो मार्ग सहज, सोपा, स्वतःच्या मनोधारणेशी मिळताजुळता आणि अनुकूल वाटतो तो भक्तीचा प्रकार निवडण्याचं स्वातंत्र्य मनुष्याला आहे.

कर्मयोग : प्रत्येक कर्म निष्काम भावनेनं म्हणजे कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता करणं म्हणजे कर्मयोग. अशा प्रकारे कर्म केली असता मन आणि बुद्धी अत्यंत शुद्ध होतात. तसेच कर्माच्या बंधनांतून साधक मुक्त होतो. आधुनिक काळात निष्काम कर्म करणं तितकं सोपं नाही; परंतु कर्म करत असताना आपलं पूर्ण लक्ष कर्म करण्याकडे देणं आणि कर्म करताना तरी फळाचा विचार न करणं शक्य आहे. असं केल्यानं कर्म उत्तम प्रकारे करता येईल आणि त्याचं जास्तीत जास्त फळ मिळेल.

ज्ञानयोग : आत्मज्ञानाच्या द्वारे परमतत्त्वाशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे ज्ञानयोग. येथे ज्ञान म्हणजे संगणक, इतिहास इत्यादी लौकिक ज्ञान नाही. लौकिक ज्ञानाच्या प्राप्तीनं परमतत्त्व जाणता येत नाही. ज्ञान शब्दाचा अर्थ आत्मज्ञान असा आहे. नाशिवंत देह हे आपलं मूळ स्वरूप नसून आत्मा हे आपलं मूळ स्वरूप आहे म्हणून आपल्यामध्ये वास करणाऱ्या आत्म्याला म्हणजेच आपल्या मूळ स्वरूपाला जाणणं म्हणजे ज्ञानयोग.

राजयोग म्हणजेच पतंजलींनी सांगितलेलं, अष्टांगयोग सांगणारं योग तत्त्वज्ञान. आतापर्यंतच्या अनेक लेखांमध्ये आपण पतंजलीच्या योगाच्या आधारेच योगाच्या विविध अंगांचा विचार केला आहे.

हठयोगाची माहिती मागील लेखात सांगितलीच आहे. अशारीतीने प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात योगाचे विविध प्रकार उदयास आले. या प्रकारांमध्ये साधना करण्याच्या पद्धती भिन्न असल्या तरी आपल्यामधील आत्मरूपी शक्तीचं स्वरूप अनुभवानं जाणणं, परमततत्त्वांशी म्हणजेच ईश्वराशी एकरूप होणं हे या सर्व योगांचे समान ध्येय आहे. परमतत्त्वरूपी एकाच शिखराकडे जाणारे हे वेगवेगळे मार्ग आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा