
ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार
नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नागपुरात चालत असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना आले असून, तिघांना अटक तर दोन महिलांची सुटका केली आहे.
नागपूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिंगणा रोडवरील ओयो अर्बन रिट्रीट येथे महिलांना जबरदस्ती देह व्यापार करण्यास प्रवृत्त केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माहितीची टीप मिळताच, पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात ज्योत्स्ना संतोष सोळंकी (वय ३८), सलमान उर्फ रोशन डोंगरे (वय ३५) आणि अक्षय रामटेके (वय ३२) या तिघांना अटक करण्यात आली आहे, तर रजत राजेश डोंगरे हा त्यांचा आणखी एक साथीदार फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिवाजी ननावरे, डब्ल्यूएचसी आरती चौहान, एनपीसी शेषराव राऊत, पीसी अश्विन मांगे, समीर शिखा, कुणाल मसराम, नितीन, एचसी किशोर ठाकरे, डब्ल्यूपीसी पूनम शेंडे यांच्या सहकार्याने हा यशस्वी छापा टाकण्यात आला. या रॅकेटमागील व्यापक नेटवर्क ओळखण्यासाठी पुढील तपास सुरू आहे आणि फरार आरोपीला लवकरच अटक होण्याची अपेक्षा आहे, अशी पुष्टी पोलिसांनी केली.
भारतीय दंड संहितेच्या कलम १४३(२)(३) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, १९५६ च्या कलम ३, ४, ५ आणि ७ अंतर्गत एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन पीडित महिलांची सुटका
पोलिस तपासात उघड झाले की, आरोपी महिलांना आर्थिक प्रलोभन दाखवून आणि महिलांना फसवून देह व्यापारात ढकलले जात असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.
ऑपरेशन शक्ती
नागपूर पोलिसांनी सांगितले की, ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत महिलांचे शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. देह व्यापारासारख्या गुन्हेगारी प्रकरणांवर नागपूर पोलिसांचा धडक मोहीम सुरू असल्यामुळे नागरिकांनीही अशा प्रकारच्या प्रकरणांची माहिती पोलिसांना द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून सुरू असून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.