
मुंबई : नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा उत्सव आहे. या काळात देवी दुर्गेच्या ९ रूपांची पूजा, उपासना आणि व्रत केले जाते. वर्षभरात दोन वेळा नवरात्र येते – एक चैत्र महिन्यात (वसंत ऋतूमध्ये) आणि दुसरी आश्विन महिन्यात (शरद ऋतूमध्ये). या दोन नवरात्रांना चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र असे म्हणतात. दोन्ही नवरात्रांमध्ये देवी दुर्गेच्या उपासनेचे साम्य असले तरी त्यामागील इतिहास , साजरे करण्याची परंपरा, कालावधी आणि धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व यामध्ये काही फरक आहेत. चैत्र नवरात्र हे विशेषतः आध्यात्मिक साधना व आत्मिक शुद्धीसाठी ओळखले जाते, तर शारदीय नवरात्र हे सामूहिक पूजा, सार्वजनिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक उत्सवांच्या दृष्टीने अधिक व्यापक आणि लोकप्रिय आहे.
चैत्र नवरात्री
चैत्र नवरात्री हिंदू पंचांगानुसार वर्षातील पहिला नवरात्र उत्सव आहे, जो चैत्र महिन्यात (मार्च-एप्रिल) साजरा केला जातो. या नवरात्रीला वसंत नवरात्र असेही म्हणतात कारण तो वसंत ऋतूच्या सुरुवातीस येतो. चैत्र नवरात्रीचे धार्मिक महत्त्व फार मोठे आहे कारण हा नववर्षाचा आरंभ मानला जातो. या काळात दुर्गामातेची आराधना केली जाते . चैत्र नवरात्रीच्या अखेरीस रामनवमी साजरी होते, ज्यादिवशी भगवान रामाचा जन्म झाला होता. मुख्यतः उत्तर भारतात याला विशेष महत्त्व आहे. या नवरात्रीत उपवास, ध्यान आणि देवीची आराधना करून आत्मिक शुद्धी साधण्यावर भर दिला जातो. चैत्र नवरात्रीमध्ये मुख्यत्वे राम जन्मोत्सवाचे धार्मिक महत्त्व जोडलेले आहे. या काळात देवीची पूजा, जप, उपवास, रामायण पठण आणि रामनवमीचा उत्सव असतो.
शारदीय नवरात्री
शारदीय नवरात्री ही सर्वात मोठी आणि प्रसिद्ध नवरात्र आहेत, जी आश्विन महिन्यात साजरी केली जाते . या नवरात्रीला दुर्गा नवरात्र किंवा शरद नवरात्र देखील म्हणतात. या नवरात्रीत देवी दुर्गेच्या ९ रूपांची पूजा अत्यंत भक्तिभावाने केली जाते. बंगाल, महाराष्ट्र, गुजरात आणि इतर प्रांतांमध्ये याला विशेष महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी किंवा दसरा . शारदीय नवरात्री मोठ्या प्रमाणावर सार्वजनिकरित्या साजरी केली जाते . या काळात मंडळांमध्ये पूजा, जागरण, नृत्य-नाट्य, गरबा , दांडिया आणि धार्मिक कार्यक्रम भरपूर प्रमाणात होतात. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन देखील केले जाते .
थोडक्यात फरक सांगायचा झाल्यास, चैत्र नवरात्र हे हिंदू नववर्षाचं स्वागत करतं, तर शारदीय नवरात्र हे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाच्या दृष्टीने अधिक भव्य असतं. दोन्ही नवरात्रात देवीच्या उपासना, व्रत, हवन, पूजा आणि उपवास केले जातात, परंतु शारदीय नवरात्र अधिक प्रसिद्ध आणि सार्वजनिक स्वरूपात साजरी केली जाते.