Saturday, September 13, 2025

झेंडे प्लॅटर...!

झेंडे प्लॅटर...!

आसावरी जोशी : मनभावन

आपला देश, महाराष्ट्र, मुंबई ... या तिन्हींशी निगडित प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या घरासाठी अत्यंत अभिमानास्पद.. सन्माननीय.. छत्रपती शिवाजी महाराज, देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आचार्य अत्रे, सेनापती बापट, बाबूजी सुधीर फडके.. अशा मंडळींचा माझे आजोबा आचार्य अत्र्यांच्या दैनिक मराठामध्ये छायाचित्रकार असल्यामुळे सतत घरी राबता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ या गोष्टी ऐकत, अनुभवतच मी मोठी झाले. त्यातल्या त्यात मुंबई आणि मुंबईशी निगडित प्रत्येक गोष्ट माझ्या आवडीची. अगदी अभिमानाची. मग देदीप्यमान इतिहास असलेले मुंबई पोलीस तर आमच्या घरासाठी, माझ्यासाठी विशेषच महत्त्वाचे. माझ्यासाठी तर मुंबई पोलीस म्हणजे माझे खरे मित्र आहेत. कधीही मदतीला धावून येणारे. एका फोनसरशी मदतीला दारात येऊन उभे राहणारे, सच्चे दोस्त...!

नुकतीच ओटीटी वाहिनीवर इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्या पराक्रमाची गाथा १९८६मध्ये प्रत्येकाच्या तोंडून आळवली जाऊ लागली. माझे आजोबा, तर मुंबई पोलीस खात्याचे कौतुक करताना कधी थकत नसत. ते नेहमी सांगत मुंबई पोलीस खात्याची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. “काय चार्ल्स कसा आहेस?” अशी सहज खांद्यावर थाप मारत एका आंतरराष्ट्रीय मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला इन्स्पेक्टर मधुकर झेंडेंनी गोव्यातून दुसऱ्यांदा सहज अटक करून मुसक्या आवळून मुंबईत आणले होते. त्यांच्यावरील चित्रपटाच्या निमित्ताने इन्स्पेक्टर झेंडेंचा भीमपराक्रम पुन्हा स्मरणात आला.

चार्ल्स शोभराज. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार. आई व्हिएतनामी, वडील भारतीय. अट्टल जुगारी. सिरीयल बिकिनी किलर म्हणून कुप्रसिद्ध. सुंदर.. उच्छभ्रू मुलींशी मैत्री करून त्यांचा खून करणे ही त्याची मानसिकता. १९७१ मध्ये इन्स्पेक्टर झेंडेंनी त्याला पकडले. त्याची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली होती. पण तेथील २० अधिकाऱ्यांना स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिठाईतून गुंगीचे औषध घालून तुरुंगातून पोबारा केला होता. त्याला पकडण्याच्या कामगिरीवर पुन्हा इन्स्पेक्टर झेंडेंची नियुक्ती करण्यात आली. अत्यंत छानछोकीचे आयुष्य जगणारा चार्ल्स तुरुंगातून पळाल्यानंतर गोव्याला सापडेल हा झेंडेंचा कयास बरोबर निघाला आणि कॅफे इटेरो या बारमध्ये आहे अशी टीप झेन्डेना मिळाली. त्याप्रमाणे बारच्या बाहेर भारत पाकिस्तान हॉकीचा सामना पाहत असलेल्या चार्ल्सला इन्स्पेक्टर झेंडेंनी मोठी स्टायलिश अटक केली. या अटकेची कायम आठवण राहावी म्हणून कॅफे इटेरोने खास इन्स्पेक्टर झेंडेंच्या नावाने डिश बनवली जी आजही सर्व्ह केली जाते. पुढे चार्ल्सला जन्मठेपेची शिक्षा होऊन २०२२ मध्ये तो सुटला आणि नेपाळला गेला. तेथे नेपाळ पोलिसांनी त्याला अटक केली आणि आता या सगळ्या थरार घटनेवर चित्रपट निघाल्याने पुन्हा एकदा इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांचे झळाळते कर्तृत्व समोर आले आहे. त्यामुळे मनभावनमध्ये त्यांची दखल घेण्याचा मोह मला आवरला नाही.

मूळ पुण्याचे असलेले मधुकर झेंडे रेडिओ इंजिनीअर होऊन पोलीस दलात दाखल झाले. आणि मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची बदली झाली. भारदस्त शरीरयष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुन्हेगारांना धडकी भरविणारा त्यांचा दणदणीत आवाज. धारावी.. मोहंमदअली रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परीसरासारख्या संवेदनशील भागांवर त्यांची विशेष जरब होती. सामान्य माणसाना मदत करणे हे त्यांचे ब्रीद आणि त्याला ते नेहमीच जागले. एकदा पोलीस मुख्यालयाच्या बाहेर गडबड झाली आणि सशस्त्र गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी हाती कोणतेही शस्त्र नसताना केवळ आवाजाच्या जोरावर इन्स्पेक्टर झेंडेंनी परिस्थिती हाताळली आणि गुन्हेगारांना अटक केली..

“सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” हे मुंबई पोलिसांचे ब्रीद आहे. त्याला ते खरोखरच जागतात. प्रसंग कोणताही आणि कितीही बाका असो, मुंबई पोलीस २४/७ रस्त्यावर असो. केवळ १०० नंबरला फोन केल्यावर पुढील पाचव्या मिनिटाला हा सच्चा दोस्त आपल्या दारात उभा राहातो.

मुंबई जगातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेले शहर आहे. विविध अडचणी असूनही मुंबई वाहतूक पोलीस आपल्या शास्त्रीय व कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या या सच्च्या दोस्ताला मनापासून सलाम!!!

Comments
Add Comment