
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेला धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. ते मनसेतून बाहेर पडले आहेत. मागील काही काळापासून प्रकाश महाजन हे मनसेच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर होते. मनसेच्या नाशिकच्या मेळाव्याला प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आले नव्हते. प्रवक्ते असूनही प्रकाश महाजन यांना पक्षाने प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. अखेर प्रकाश महाजन यांनी प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत मनसेतून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.
प्रकाश महाजन यांनी राजीनामा देण्याचे कारण स्वतः जाहीर केलेले नाही. तसेच मनसेतून बाहेर पडल्यानंतर पुढे काय करणार याबाबतही माहिती दिलेली नाही.
भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे बंधू असलेल्या प्रकाश महाजन यांनी काही वर्षांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला होता. प्रमोद महाजन यांची हत्या झाली. यानंतर काही दिवसांनी प्रकाश महाजन राजकारणात सक्रीय झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच ते पक्षामध्ये होते. मराठवाड्यातील मनसेचा प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रांमध्ये ते मनसेचे प्रवक्ते म्हणून सहभागी होत होते.