Saturday, September 13, 2025

कोकणच्या मातीची मिठ्ठास भ्रमंती...

कोकणच्या मातीची  मिठ्ठास भ्रमंती...

राजरंग : राज चिंचणकर

कोकणचा प्रदेश, तिथला निसर्ग, तिथली माणसे या सगळ्यांत गोडवा ठासून भरलेला आहे. अशा प्रकारची मिठ्ठास मुरलेल्या मातीतून जेव्हा एखादी कलाकृती जन्माला येते, तेव्हा तिच्यात अधिक उणे काही होण्याची शक्यता फारच कमी असते. अगदी त्याबरहुकूम, आता ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या मराठी सिनेमाने कोकणाला आर्त साद घालत रूपेरी पडद्यावर साखरपेरणी केली आहे.

सुनील तावडे, प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले, साईंकित कामत, स्वानंदी टिकेकर यांच्यासारखे कलावंत एखाद्या सिनेमात एकत्र आले आहेत म्हटल्यावर, त्या कलाकृतीच्या माध्यमातून उत्तम तेच अनुभवायला मिळणार याबाबत शंका उरत नाही. या आणि त्यांच्यासह सिनेमात असलेल्या इतर कलावंतांनी मिळून ‘कुर्ला टू वेंगुर्ला’चा हा प्रवास देखणा केला आहे. या सिनेमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातल्या व्यक्तिरेखा...! कोकणातल्या इरसालकीची मूर्तिमंत उदाहरणे ठरावीत, अशी यातली पात्रे आणि त्यांचे अचूक प्रकटीकरण यामुळे हा सिनेमा उठावदार झाला आहे. त्यादृष्टीने सिनेमाची कथा, पटकथा व संवादलेखन करणारे अमरजित आमले; दिग्दर्शक विजय कलमकर आणि त्यांच्या एकूणच टीमचे परिश्रम फळाला आल्याचे स्पष्ट होते.

शहरातला एकूणच कोलाहल आणि ग्रामीण जगरहाटीतली शांतता, अशा दोलायमान स्थितीवर हा सिनेमा हिंदोळे घेत जातो. या दोन्ही संस्कृतींचा मिलाफ साधत आणि त्यायोगे, प्रकर्षाने कोकणातल्या माणसांच्या अंतरंगात उतरून त्यांच्या जीवनमानाची मुशाफिरी घडवत हा सिनेमा बरेच काही बोलत राहतो. लग्न आणि त्यानुसार निर्माण होणाऱ्या प्रश्नांना गवसणी घालण्याचे कार्य हा सिनेमा करत असला, तरी त्या आडून एकूणच मानवी जीवनाचे सार उलगडून सांगण्याचे कर्तव्यही तो बजावतो. समुद्रकिनाऱ्याच्या साक्षीने शहर आणि गाव यातली सीमारेषाही तो ठळकपणे स्पष्ट करतो. ग्रामीण भागातल्या तरुणाईच्या मानसिकतेचा घेण्यात आलेला वेध, हेही या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे.

हे सर्व करताना, हा सिनेमा पार कोकणाची भ्रमंती घडवून आणतो. अगदी दशावतारापासून होळीपर्यंतचे कोकणाचे उत्सवी प्रतिबिंब या सिनेमात पडले आहे. इतकेच नव्हे; तर हा सिनेमा पडद्यावर प्रसन्नतेचे चांदणे पसरवत जातो आणि याचे कारण म्हणजे सिनेमाचे छायाचित्रण...! कोकणातली निसर्गस्थळे विहंगमतेने टिपण्याचे काम रंगनाथ बाबू गोगीनेनी यांच्या कॅमेऱ्याने यात करून ठेवले आहे. कॅमेरावर्कचा उत्कृष्ट नमुना सादर करत असतानाच निळेशार आभाळ, हिरवीगार वनसंपदा आणि लाल माती यांचा उत्तम त्रियोग यात साधला गेला आहे. एकूणच, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या सिनेमाने माणसाचे एकंदर जगणे, नातेसंबंध यावर थेट भाष्य करत कोकणाच्या पार्श्वभूमीवर यातला आशय अधिकच बोलका केला आहे.

Comments
Add Comment