Thursday, September 18, 2025

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी चित्रपट ‘तू माझा किनारा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. कुटुंब, नातेसंबंध आणि बदलत्या पालकत्त्वावर आधारित असलेला हा चित्रपट आजच्या धावपळीच्या युगात माणसामाणसांतील नात्यांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा ठरेल, असा विश्वास स्टीफन यांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटामागील प्रेरणेबद्दल बोलताना स्टीफन म्हणाले, "सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाचे जीवन खूप वेगवान झाले आहे. आपण आपल्या प्रियजनांना वेळ देणे विसरतो. या कथेद्वारे आपण आधार, जबाबदारी आणि प्रेम या मूल्यांची आठवण करून देत आहोत. पालक आपल्या मुलांसाठी भिंतसुद्धा असावेत आणि नायकसुद्धा."

सुरुवातीला हा चित्रपट मल्याळम भाषेत करण्याची कल्पना होती, मात्र स्टीफन यांना वाटले की ही कथा मराठी संस्कृतीशी अधिक सुसंगत आहे. "इथले नातेसंबंध, कुटुंबातील जिव्हाळा आणि मूल्ये खूप खोलवर आहेत. म्हणून हा चित्रपट मराठीत बनवायचा निर्णय घेतला," असे ते म्हणाले.

"जर आशय चांगला असेल, तर प्रेक्षक नक्कीच जोडले जातील"

'तू माझा किनारा' हा चित्रपट एक मजबूत भावनिक कथा सांगतो. स्टीफन यांना विश्वास आहे की प्रेक्षक नक्कीच या चित्रपटाशी जोडले जातील. "पालकत्वावर आधारित चित्रपट मराठीत फारसे बघायला मिळत नाहीत. ही कथा प्रत्येकाच्या आयुष्यातील वास्तव आहे, त्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनाला भिडेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्टीफन यांनी चित्रपटाच्या संगीताबद्दल आणि निर्मिती मूल्यांबद्दलही समाधान व्यक्त केले. "ही एक चांगली कथा आहे, उत्तम संगीत आहे आणि technically ही एक दर्जेदार निर्मिती आहे. त्यामुळे मला वाटतं की हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र ठरेल," असे ते ठामपणे म्हणाले.

‘तू माझा किनारा’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर आजच्या धकाधकीच्या जीवनात हरवलेल्या नात्यांची आठवण करून देणारा एक भावनिक अनुभव आहे.

Comments
Add Comment