Thursday, September 11, 2025

गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल पाडणारच

गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल पाडणारच

पूल वाचवणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे

पूल वाचवल्यास प्रकल्प खर्च आणि कालावधीही वाढणार

मुंबई : मुंबई महापालिकेने सात वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१८ साली बांधलेला गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल आता विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्प कामांमध्ये अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल आता पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. परंतु याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. तरी या प्रकल्प कामांमधील अडथळा ठरणाऱ्या या पुलाचे बांधकाम वाचवणे शक्यच नसल्याने हा पूल पाडल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे या प्रकल्प कामाला गती देण्यासाठी हे पूल पाडण्यावर महापालिका पूल विभाग ठाम असल्याचे दिसून येत आहे.

गोरेगाव पश्चिमेतील वीर सावरकर उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट जोडतो. या पुलामुळे गोरेगाव आणि मालाड परिसरातील प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून १० मिनिटांवर आला होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली होती. परंतु, आता हाच पूल मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी वीर सावरकर उड्डाणपूल पाडल्यानंतर त्या जागी दुमजली पूल उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. या दुमजली पुलाचा वरचा भाग मालाडमधील माइंडस्पेसपासून दिंडोशी कोर्टापर्यंत पोहोचेल, तर खालचा भाग सध्याच्या वीर सावरकर उड्डाणपुलाची जागा घेईल. यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणी मिळणार आहे. तसेच, कोस्टल रोडमधून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर थेट प्रवेश देण्यासाठी हा दुमजली पूल महत्त्वाचा ठरेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

या विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पासाठी सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतल्याने याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन काय निर्णय घेते आणि आराखड्यात काही बदल करते का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र महापालिका प्रशासनाने हा पूल पाडल्याशिवाय पर्यायच नसल्याचे स्पष्ट केले. जर हे पूल तसेच ठेवून काम केल्यास विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च वाढेल आणि वेळही अधिक वाढून प्रकल्पाचे काम लांबणीवर पडेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment