
बीड: बीडच्या परळी तालुक्यात झालेल्या रस्ते अपघातात एका सरपंचाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परळी तालुक्याच्या जळगव्हाणचे हे सरपंच वसंत चव्हाण आपल्या नातीला दवाखान्यातून परत आणत होते. त्याचवेळेस हा दुर्देवी अपघात घडला.
सरपंच वसंत चव्हाण हे आपल्या नातीला दवाखान्यात दाखवून घरी परत आणत होते. यावेळेस परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर पांगरीजवळ समोरून येणाऱ्या हायवाने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सरपंच वसंत चव्हाण आणि त्यांची नात श्रुती चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर वसंत चव्हाण यांच्या पत्नी कस्तुराबाई चव्हाण या अपघातात गंभीर जखमी झाल्या.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.