
नवी दिल्ली: गेल्या चार दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड अराजकता माजली आहे. सोशल मीडियावरील बंदीवरून सुरू झालेलं Gen Z तरुणांचं आंदोलन इतकं चिघळलं की, त्याचा परिणाम जाळपोळ आणि दंगलीत झाले. यात नेपाळचे संसद, न्यायालय सारख्या अनेक महत्वाच्या इमारतीला आग लावण्यात आली, या आगीत माजी पंतप्रधानांच्या पत्नीला देखील जिवंत जाळण्यापर्यंत मजल गेली. आता या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून मोदींनी यावर भूमिका मांडली आहे.
नेपाळमध्ये सुरू असलेले Gen Z तरुणांचे आंदोलन केवळ सोशल मीडिया बंद करण्यावर नाही तर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सरकारच्या भ्रष्टाचाराचं व्यापक कारण देखील आहे. या आंदोलनाने नेपाळमधलं सरकार कोसळलं असून नवीन सरकार स्थापनेच्या हालचालीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी नेपाळमधल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. नेपाळमधील तरुणांना शांतता राखण्याचे आणि कायदा व सुव्यवस्थेचं पालन करण्याची विनंती पंतप्रधानांनी केली.
आज हिमाचल प्रदेश और पंजाब के दौरे से लौटने के बाद Cabinet Committee on Security की बैठक में नेपाल के घटनाक्रम को लेकर विस्तार से चर्चा हुई। नेपाल में हुई हिंसा हृदयविदारक है। यह जानकर बहुत पीड़ा हुई कि इसमें अनेक युवाओं की जान गई है। नेपाल की स्थिरता, शांति और समृद्धि हमारे लिए…
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2025
आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून मोदींनी यावर भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, "आज हिमाचल प्रदेश व पंजाबच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर सुरक्षेसंदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेपाळमधील परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. नेपाळमध्ये झालेली हिंसा हृदयद्रावक आहे. यात अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याचं ऐकून फार वाईट वाटलं. नेपाळमध्ये स्थैर्य, शांतता व समृद्धी प्रस्थापित होणे खूप महत्वाचे आहे. मी नेपाळमधील माझ्या सर्व बांधवांना विनम्र आवाहन करतो की त्यांनी शांतता, कायदा व सुव्यवस्थेचं पालन करावं”, असं मोदींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नेपाळमधील परिस्थितीवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा असं सांगत पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आधीच राजीनामा दिला आहे. त्यांच्यापाठोपाठ काही तासांतच राष्ट्रपतींनीदेखील राजीनामा दिला.
नेपाळमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली
आधीचे सरकार आणि त्यांच्याशी संबंधित सर्व यंत्रणा उद्ध्वस्त केल्यानंतर आता नेपाळमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी जेनझी आंदोलकांकडून केली जात आहे. दुसरीकडे नेपाळमधील विरोधी पक्षांची काही प्रमुख नेतेमंडळीही यासाठी तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. नेपाळमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होणं आवश्यक असल्याचं मत आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
नेपाळच्या प्रमुख इमारती आगीच्या भक्षस्थानी
सोमवारी नेपाळ सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, एक्स अशा सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संतप्त झालेले तरुण रस्त्यावर उतरले. या दरम्यानआंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्यात आला.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी नेपाळच्या संसदेला आंदोलकांनी आग लावली होती. मंगळवारी याचा पुढचा टप्पा आंदोलकांनी गाठला. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीला आंदोलकांनी आग लावली. त्यानंतर पंतप्रधानांचे आणि इतर मंत्र्यांची निवासस्थाने तसेच सरकारच्या इतर काही महत्त्वाच्या इमारतींना आग लावली. धक्कादायक बाब म्हणजे माजी पंतप्रधानांच्या पत्नीला आंदोलकांनी जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच काल नेपाळच्या कांतिपूर मीडिया ग्रुपचे काठमांडू येथील मुख्यालय देखील आंदोलकांकडून जाळण्यात आले आहे. त्यामुळे ही अराजकता लवकरात लवकर थांबणे आणि शांतता प्रस्थापित होणे गरजेचं झालं आहे.