
तीन दिवस शिल्लक असल्याने अर्जदारांची संख्या वाढण्याची शक्यता
मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. ठाणे, वसई, कल्याण आणि नवी मुंबई या ठिकाणांतील ५,२८५ घरांसाठी आतापर्यंत म्हणजेच मंगळवारी सायंकाळी पाऊणे सहावाजेपर्यंत तब्बल १ लाख ६७ हजार ५६७ अर्ज म्हाडाकडे आले आहेत. त्यापैकी १ लाख ३२ हजार ९४३ जणांनी अनामत रकमेसह अर्ज भरले आहेत. अजून तीन दिवस अर्ज भरण्याची मुदत शिल्लक असल्याने अर्जदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हाडाला लॉटरीत समाविष्ट असलेल्या घरांच्या संख्येपेक्षा ३१ पट जास्त अर्ज मिळाले आहेत. यावेळी पहिल्यांदाच मुंबई मंडळाइतकीच मागणी कोकण मंडळाच्या घरांसाठी दिसत आहे. सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला दि. १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
या सोडतीत वेगवेगळ्या योजनांअंतर्गत घरे उपलब्ध आहेत. त्यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५६५ घरे, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३,००२ घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना आणि विखुरलेल्या स्वरूपातील १,६७७ घरे आणि ५० टक्के योजनेअंतर्गत ४१ घरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा आणि नवी मुंबईसारख्या ठिकाणी ही घरे उपलब्ध असून त्यांची किंमत ९.५० लाखांपासून ते ८५ लाख रुपयांपर्यंत आहे. आज मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत तब्बल १ लाख ६७ हजार ५६७ अर्ज भरले तर त्यापैकी त्यापैकी १ लाख ३२ हजार ९४३ जणांनी अनामत रकमेसेह अर्ज भरले आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी दि. २२ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.