
१ कोटी ८० लाखांचे उत्पन्न; ३१,५४६ प्रवाशांचा प्रवास
पालघर(प्रतिनिधी) : पालघर एसटी विभागाच्या माध्यमातून गणेशोत्सवात कोकणाकडे आणि परतीसाठी एकूण ७०६ विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या, ज्यामुळे तब्बल ३१,५४६ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, विशेष नियोजनामुळे एसटी महामंडळाला या काळात सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. गणेशोत्सव आणि गौरी उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन, पालघर एसटी विभागाकडून विशेष बससेवांचे नियोजन करण्यात आले होते. २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या बसगाड्यांची गर्दी लक्षात घेता, विभागाकडून ६५५ बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये पालघर विभागाच्या स्वतःच्या १४२ बसेससह इतर विभागांकडूनही अतिरिक्त बसेस मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये नागपूर प्रदेशातून १५०, अमरावती प्रदेशातून १७३ आणि रत्नागिरी विभागातून ९९ बसेसचा समावेश होता.
बसेस विरार, मानवेल पाडा, नालासोपारा, नवघर आणि वसई अर्नाळा येथून सोडण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांची सोय झाली. या बसेससाठी प्रवाशांनी आगाऊ बुकिंग केले होते. गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या ५६७ बसेसने २५,६६८ प्रवाशांना घेऊन प्रवास केला, ज्यामुळे एसटीला १,४६,९४,२५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणेशोत्सवानंतर कोकणहून पालघरकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष बससेवा सुरू करण्यात आली होती. यामध्ये पालघर विभागाच्या १३९ बसेसद्वारे वाहतूक करण्यात आली. या परतीच्या प्रवासात ५,५६० प्रवाशांनी प्रवास केला, ज्यामुळे ३३,५४,५४२ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
एकंदरीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व परत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोडलेल्या ७०६ बसेसने एकूण ३१,५४६ प्रवाशांची ने-आण केली आणि एसटी महामंडळाला १,८०,४८,७९७ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.