
बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन
क्वालालंपूर: भारतातील गणेशोत्सवाची धूम फक्त देशातच नाही, तर परदेशातही पाहायला मिळत आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे भारतीय नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने घरगुती गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला.
वाशिम जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले मोहित दुबे आणि त्यांच्यासोबत इतर भारतीय नागरिक दरवर्षी एकत्र येऊन गणेशाची प्रतिष्ठापना करतात. यावेळीही ढोल-ताशांच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
मातृभूमीपासून दूर असले तरी भारतीय सण आणि संस्कृती जपण्याचा निर्धार यावेळी सर्व भारतीयांनी व्यक्त केला. अशाप्रकारे एकत्र सण साजरे केल्याने भारतीयत्वाची भावना अधिक दृढ होते आणि पुढच्या पिढीलाही आपल्या परंपरांची ओळख होते, अशी भावना तिथे राहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली. या विसर्जन सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, स्थानिक मलेशियाच्या नागरिकांनाही भारतीय संस्कृतीचा अनुभव घेता आला, हे विशेष.