Thursday, September 18, 2025

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या दुधाच्या खरेदी दरात पुन्हा एकदा प्रतिलिटर एक रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता गाईच्या दुधाचा खरेदी दर ३५ रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी दरवाढ असून, यापूर्वी १ ऑगस्ट आणि २१ ऑगस्ट रोजी प्रत्येकी एक रुपयांची वाढ करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून बटर आणि दूध पावडरच्या दरात वाढ झाली आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात दुधाची मागणी वाढणार असल्याने संघांनी खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ (SNF) असलेल्या दुधासाठी लागू असेल.

सध्या राज्यात दररोज सुमारे १.५ कोटी लिटर दूध संकलन होत आहे, जे नेहमीच्या पावणे दोन ते दोन कोटी लिटरच्या तुलनेत कमी आहे. वाढलेले पशुखाद्याचे दर आणि चाऱ्याची टंचाई यामुळे दूध संकलनात घट झाली होती. मात्र, आता राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा