Monday, September 15, 2025

अरुण गवळीला जामीन, लवकरच जेलबाहेर येणार

अरुण गवळीला जामीन, लवकरच जेलबाहेर येणार

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन आणि अखिल भारतीय सेना या पक्षाचा माजी आमदार अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. याआधी अरुण गवळीने अनेकदा जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. पण त्याला जामीन मिळत नव्हता. अखेर अरुण गवळीला जामीन मंजूर झाला आहे. जामीन मिळाल्यामुळे अरुण गवळी १७ वर्षांनंतर जेलबाहेर येणार आहे.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपरमध्ये १७ वर्षांपूर्वी हत्या झाली. जामसंडेकर यांची घाटकोपरमधील त्यांच्या राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या झाली. निवांत टीव्ही बघत बसलेल्या कमलाकर जामसंडेकर यांच्यावर घरात घुसून गुंडांनी गोळीबार केला होता. जवळून गोळ्या लागल्यामुळे कमलाकर जामसंडेकर यांचा मृत्यू झाला होता. ही घटना २ मार्च २००७ रोजी संध्याकाळी घडली होती. जामसंडेकरच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी आमदार अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ होती. या प्रकरणी १७ वर्षांपासून अरुण गवळी जेलमध्ये होता. अरुण गवळीला दुसऱ्या एका प्रकरणातही शिक्षा झाली होती, पण त्या प्रकरणात काही काळापूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र जामसंडेकर हत्येप्रकरणी जामीन मिळत नसल्यामुळे अरुण गवळी जेलमध्येच होता. आता जामसंडेकर प्रकरणातही जामीन मंजूर झाल्यामुळे अरुण गवळी १७ वर्षांनंतर जेलबाहेर येणार आहे.

कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येच्या काही दिवस आधीच मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत कमलाकर जामसंडेकरांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचा उमेदवार अजित राणेचा ३६७ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर जामसंडेकर नगरसेवक झाले. पुढे २ मार्च २००७ रोजी जामसांडेकर यांची हत्या झाली. या प्रकरणात अरुण गवळीसह एकूण ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर ३ सहआरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले होते.

Comments
Add Comment