Thursday, September 18, 2025

Dahi Handi 2025 : गोविंदा आला रे..! मुंबईत दहीहंडीचा थरार, ठिकठिकाणी हंडीला सलामी; महिला गोविंदांचीही रंगतदार एन्ट्री

Dahi Handi 2025 : गोविंदा आला रे..! मुंबईत दहीहंडीचा थरार, ठिकठिकाणी हंडीला सलामी; महिला गोविंदांचीही रंगतदार एन्ट्री

मुंबई : राज्यभरात आज गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने दहीहंडी उत्सवाची धूम शहरापासून उपनगरांपर्यंत सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील प्रमुख चौक, गल्लीबोळ, तसेच उपनगरांमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळांकडून भव्य दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाच्या मुसळधार सरी सुरू असल्या तरीही उत्साही गोविंदांचा जोश मात्र अजिबात कमी झालेला नाही. "ढाक्कू माकूम, ढाक्कू माकूम... मच गया शोर सारी नगरी" यांसारख्या गाण्यांच्या ठेक्यावर गोविंदा पथकांनी रंगतदार हजेरी लावली आहे. एकमेकांच्या खांद्यावर उंच मानवी मनोरे रचत गोविंद पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. सुरक्षेची विशेष काळजी घेत स्थानिक प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी महिलांच्या गोविंदा पथकांनीही सहभाग घेतल्याने उत्सवाला वेगळीच रंगत आली आहे. सर्व वयोगटातील नागरिक, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, या सोहळ्याचा आनंद घेत आहेत.

मुंबईत दहीहंडी उत्सवात राजकीय रंग

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे. शहरासह उपनगरांमध्ये विविध ठिकाणी भव्य दहीहंड्यांचे सोहळे सुरू असून, या उत्सवाला राजकीय छटा लाभत असल्याचे चित्र दिसत आहे. दादर येथील आयडियल बुक डेपो जवळील साईदत्त मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यात महिला गोविंदा पथकानेही सहभाग नोंदवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ‘तेजस्विनी महिला गोविंदा पथका’कडून पारंपरिक जल्लोष आणि घोषणाबाजीसह दहीहंडीला सलामी देण्यात आली. पावसाच्या सरी, ढोल-ताशांचा गजर आणि "गोविंदा आला रे आला" या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रे

ठाण्यात गोकुळ हंडीचा जल्लोष

ठाण्यातील कॅसलमिल परिसरात शारदा संकल्प प्रतिष्ठानतर्फे भव्य गोकुळ हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. अल्पावधीतच प्रतिष्ठेची दहीहंडी म्हणून लौकिक मिळवलेल्या या उत्सवाचे आयोजन कृष्णा पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, ठाणेकरांच्या उत्साहाला उधाण आले आहे. सकाळपासूनच शहरातील विविध गोविंदा पथकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. नावनोंदणीसाठी पथकांच्या प्रतिनिधींनी रांगा लागल्या असून, यावरून या दहीहंडीचा वाढता नावलौकिक अधोरेखित होतो. उत्सवात सहभागी होण्यासाठी शहरातील तसेच उपनगरांतील पथके स्पर्धात्मक जोशात सज्ज झाली आहेत. “सलामी देण्याची संधी” मिळवण्यासाठी गोविंदांमध्ये मोठी चुरस दिसत आहे. ठिकठिकाणी ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या ठेक्यावर नाचणारे तरुण आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर उत्साहात न्हाऊन निघाला आहे.

कल्याण-डोंबिवलीत ३२५ दहीहंड्यांचा जल्लोष; पोलिसांचा कडक बंदोबस्त

यंदा कल्याण-डोंबिवली परिसरात दहीहंडी उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. खासगी २७५ आणि सार्वजनिक ५० असे मिळून तब्बल ३२५ दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळपासूनच गोविंदांच्या जल्लोषात शहर दुमदुमून गेले आहे. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध राजकीय नेत्यांची आणि सेलिब्रिटींची उपस्थिती राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला वेगळीच झळाळी लाभली आहे. राजकीय रंग आणि मनोरंजनाचा संगम झाल्याने उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष आकर्षण ठरत आहेत, कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकातील शिंदे-ठाकरे गटाच्या समोरासमोर उभारलेल्या भव्य दहीहंड्या. या दहीहंड्यांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, गोविंद पथकांमध्ये त्यासाठी प्रचंड चुरस दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दीची शक्यता लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली पोलीस दलाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन सेवांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उत्साही घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर थिरकणारे तरुण-तरुणी यांनी शहराच्या गल्लीबोळात उत्सवी जल्लोषाची लहर पसरवली आहे.

दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी SRPFची तुकडी, तब्बल २२ निरीक्षक, ७१ अधिकारी आणि ६०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी, वाहतूक व्यवस्था आणि देखरेखीसाठी पोलिसांकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी केवळ प्रशासनच नव्हे तर अनेक सार्वजनिक आणि खाजगी मंडळांकडूनही विशेष तयारी करण्यात आली आहे. उंच दहीहंड्यांभोवती सुरक्षा जाळी, गादी, पाण्याची सोय आणि तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment