Tuesday, September 30, 2025

रोहित आणि विराटसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा शेवटचा ठरणार ?

रोहित आणि विराटसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा शेवटचा ठरणार ?
मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली या दोघांनी निवृत्ती जाहीर केली. आता रोहित आणि विराट फक्त एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. ते चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे. बीसीसीआयमधील सूत्रांकडून रोहित आणि विराट संदर्भात येत असलेल्या बातम्या जास्त उत्साहवर्धक नाहीत. त्यामुळेच भविष्यात रोहित आणि विराटसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे कठीण होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत ऑस्ट्रेलिया विरोधात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. हीच मालिका रोहित आणि विराटसाठीची शेवटची एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका असण्याची शक्यता आहे. बीसीसीआयची निवड समिती २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी संघ तयार करण्याचे नियोजन करत आहे. या नियोजनात रोहित आणि विराटला स्थान नाही. शिवाय अनेक नवोदीत क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धांमध्ये तसेच टी २० मध्ये चांगली कामगिरी करत आहेत. यामुळे विश्वचषकासाठीच्या संघाचा विचार करताना तरुण खेळाडूंना प्राधान्य दिले जाण्याची चिन्ह आहेत. या परिस्थितीत ऑक्टोबर २०२५ चा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा हाच रोहित आणि विराटसाठीचा शेवटचा दौरा ठरण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहित आणि विराट दिसणार होते. पण हा दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द झाला आहे. यामुळे रोहित आणि विराट आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतच खेळताना दिसणार आहेत. भारत ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या स्पर्धेनंतर रोहित आणि विराट या दोघांना पुढे खेळण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी रोहित आणि विराटला विजय हजारे ट्रॉफी लिस्ट ए स्पर्धेत भाग घेण्याचे बंधन घातले जाण्याची शक्यता आहे. या अटीचे पालन केले नाही तर रोहित आणि विराट या दोघांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा हाच शेवटचा दौरा असेल असे वृत्त आहे.
Comments
Add Comment