Saturday, September 13, 2025

Eknath Shinde : 'अरे त्या डिनो मोरियानं तोंड उघडलं तर'..; सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदेंचा जबरदस्त इशारा

Eknath Shinde : 'अरे त्या डिनो मोरियानं तोंड उघडलं तर'..; सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदेंचा जबरदस्त इशारा

टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण? : उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेटवटच्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी पाहायला मिळत आहे. अशातच मिठी नदीतला गाळ काढण्याचा कंत्राट देताना मराठी माणूस दिसला नाही का, असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत विरोधकांवर भडकले. आता त्या डिनो मोरियाने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरया होईल, असा मोठा इशारा त्यांनी दिला. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिलं. “काँक्रीटचे रस्ते केल्यानंतर त्यात २५ वर्षे दुरुस्ती करावी लागत नाही. मग दरवर्षी दुरुस्ती करून, काळ्याचं पांढरं करून, त्यामध्ये दुरुस्तीची कामं काढून पैसे लुबाडण्याचं काम कोण करत होतं? आम्ही तर डीप क्लीन ड्राइव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या,” अशी घणाघाती टीका त्यांनी विरोधकांवर केली.

मराठी माणूस नाही दिसला का?

गेल्या काही महिन्यांपासून मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील अनियमितता आणि निधीच्या गैरवापराचं प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाचं नाव समोर आलं आहे. त्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावरून विरोधकांना निशाणा साधत शिंदे पुढे म्हणाले, “बोलायला आम्हाला पण येतं. मिठी नदीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? यांना डिनो मोरिया दिसला, मराठी माणूस नाही दिसला का? आता त्या मोरियाने तोडं उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. आरोप करताना असे करा..

टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण? : उपमुख्यमंत्री शिंदे

'जो खुद शिशे के घर मे रहते है, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते'. जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता, तेव्हा तुम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण, ते पण सांगा. सगळी यादी काढा, मग मराठी माणसाबद्दल बोला.”

डिनो मोरिया आणि सॅन्टिनो या दोघांची ईडीकडून चौकशी सुरू

गेल्या २० वर्षांपासून मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी ११०० कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं. एकूण १८ कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. त्यापैकी अनेकांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी पालिकेचे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता ईडीनेही उडी घेतली आहे. कथित गैरव्यवहारसंबंधी आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू असून त्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचं कळतंय. याप्रकरणी डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो या दोघांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment