Saturday, October 25, 2025
Happy Diwali

चेंबूरमध्ये एसटी बस थांब्यामुळे प्रवास होणार सुखकर

चेंबूरमध्ये एसटी बस  थांब्यामुळे प्रवास होणार सुखकर

मुंबई : चेंबूरमधील खारदेव नगर, घाटला परिसरातील स्थानिकांचा लांब पल्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे. वैभव नगर येथे राज्य परिवहन सेवेचा (एसटी) बसथांबा उभारण्यात यावा, ही स्थानिकांची मागणी अखेर प्रत्यक्षात उतरली असून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर उभारण्यात आलेल्या नव्या एसटी थांब्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.

यावेळी शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे, महिला विभागप्रमुख सुनिता वैती, सहसंपर्क प्रमुख दीपक महेश्वरी, विधानसभा प्रमुख संजय राठोड, मुंबई व्यापारी सेल अध्यक्ष लक्ष्मण कोठारी, विधानसभा संघटक भास्कर चव्हाण, उपविभागप्रमुख योगेश पाटील, शाखा संघटिका किशोरी कडू, शाखासमन्वयक चेतन ढमाले अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

चेंबूरच्या घाटला परिसरात असलेल्या मध्यमवर्गीय वस्तीत मोठ्या संख्येने सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करत आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सायन- पनवेल महामार्गावरील मैत्री पार्क येथील एसटी थांब्यावर जावे लागत होते. मात्र, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी एसटी बस थांबा उभारावा, अशी स्थानिकांची मागणी होती. ही मागणी संभाजी लोखंडे यांनी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे मांडली होती. शेवाळे यांनी परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून ही मागणी प्रत्यक्षात आणली.

Comments
Add Comment