Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पालघर जिल्ह्यातील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची चौकशी होणार

पालघर जिल्ह्यातील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची चौकशी होणार

मुंबई : पालघर जिल्ह्यातील टायर पायरोलिसि रिसायकलींग कंपन्यांमधील तसेच इतर उद्योगांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सर्वेक्षण करावे आणि या संबंधीचा अहवाल एक महिन्यात द्यावा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

पालघर जिल्ह्यातील रेड झोन परिसर वाडा तालुक्यातील टायर पायरोलिसिस रिसायकलींग कंपन्यामधील प्रदूषणाबाबत तसेच बोईसर औद्योगिक क्षेत्र व सातपाटी- मुरबे खाडीमधील रासायनिक प्रदूषण बाबत वन मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी नाईक बोलत होते. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, प्रधान वन संरक्षक  नरेश झिरमुरे, उपसचिव विवेक होशिंग, उदय ढगे आदी उपस्थित होते.

वन मंत्री नाईक म्हणाले की, आम्ही कोणत्याही उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र उद्योगांमुळे प्रदूषण होत असेल आणि ते कमी करण्यासाठी संबंधित कंपन्या उपाय योजना करत नसतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. पालघर जिल्ह्यातील वाडा, तारापूर व बोईसर या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात टायर रिसायकलिंग कंपन्या तसेच इतर औद्योगिक कारखाने आहेत. या कंपनीमध्ये सुरक्षा विषयक नियमांचे पालन होते का, वापरलेले पाण्याचे विल्हेवाट योग्य पद्धतीने होते का. प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडले जाते का या सर्वांची माहिती समितीने घ्यावी. तसेच या उद्योगांमुळे पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषण होते का याचाही अभ्यास करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment