Sunday, September 14, 2025

लाडकी बहिण योजना कायम राहणार, अजित पवार यांचे प्रतिपादन

लाडकी बहिण योजना कायम राहणार, अजित पवार यांचे प्रतिपादन

पुणे : ‘जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करत आहोत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो. महिना संपल्यावर आदिती तटकरे माझ्याशी संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या, म्हणून सांगते. आम्ही तातडीने पैसे देतो.’ त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. यावेळी पवार बोलत होते.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना कशीही असली तरी, ती स्वीकारण्याची मानसिकता आपण स्वीकारली पाहिजे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांनी केले. स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल, अन्यथा त्यांच्या मतानुसार निवडणुकीला सामोरे जाऊ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) २६ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात साजरा झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्यध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक , खासदार सुनेत्रा पवार, प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, मंत्री आदिती तटकरे, आमदार चेतन तुपे, आण्णा बनसोडे, प्रमुख प्रवक्ते आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, धीरज शर्मा, सुरेश घुले, योगेश बहेल, राजलक्ष्मी भोसले, माजी आमदार सुनील टिंगरे, सुभाष जगताप, प्रदीप गाराटकर, माजी आमदार विलास लांडे, सुभाष जगताप, प्रदीप देशमुख, प्रमोद हिंदुराव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्हा महिलांना ताकद व आत्मविश्वास दिला असल्याचे सांगितले.

पवार म्हणाले, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २८ महापालिका, २५ जिल्हा परिषद, २८५ पंचायत समितीच्या तसेच नगरपालिका व नगरपरिषद यांच्या निवडणुका होत आहेत. राज्यात नव्याने १ कोटी सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असून पुण्यात दहा लाख व अन्य मोठ्या जिल्ह्यात पाच लाख सदस्य या चार महिन्यात नोंदविण्यसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. यावेळी सिने अभिनेते सयाजी शिंदे, माजी मंत्री संजय बनसोडे, नरहरी हिरवळ आदींची भाषणे झाली.

Comments
Add Comment