Saturday, November 15, 2025

कशेडी घाट मार्गांमध्ये वीजपुरवठा सुरू

कशेडी घाट मार्गांमध्ये वीजपुरवठा सुरू

मात्र भुयारी रस्त्याला जोडल्याने अपघाताची शक्यता

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही भुयारी मार्गावरील विद्युत प्रकाशझोत आणि व्हेंटीलेशनसाठीचे पंखे वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याने सध्या पूर्ण क्षमतेने दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. कशेडी घाटातील भुयारी मार्गातील वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार असला तरी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नव्याने सुरू झालेला भुयारी मार्ग संपल्यानंतर खेड बाजूला भुयार संपताच कोकणचा रस्ता मुंबईच्या भुयाराकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडल्यामुळे एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूला जाणारी वाहने रात्री समोरासमोर येतात. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युतप्रकाश योजना अद्याप रत्नागिरी जिल्ह्यात सुरू न झाल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी पनवेल पळस्पे ते कातळी भोगावच्या भुयारी मार्गापर्यंत दौरा केला. यावेळी रिलायन्स इन्फ्राचे पोटेठेकेदार एसडीपीएल कंपनीनेच भुयारी मार्गातील विद्युत पुरवठ्यासाठी पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर काहीशी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे शिंदे डेव्हलपर्स प्रोजेक्ट लिमिटेडचे शिवतारे यांनी महावितरणकडे स्वत: पाठपुरावा केला आणि दोन्ही भुयारांतर्गत विद्युत प्रकाश झोत आणि वायूविजनासाठीचे १० एक्झॉस्ट फॅन्स रात्रंदिवस सुरू राहण्यासाठी वीजपुरवठा सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

Comments
Add Comment