Monday, September 15, 2025

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीचा सेवा कालावधीत एका तासाने कमी करण्यात आला आहे, तर शनिवारी सकाळचा सेवा कालावधी एका तासाने तर रात्रीचा सेवा कालावधी एका तासाने कमी करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी या मार्गिकेवरील सेवा सकाळी ६.३० ते रात्री ९.३० दरम्यान सुरू राहणार आहे, तर शनिवारी सकाळी ७.३० ते रात्री ९.३० या वेळेत सेवा सुरू राहणार आहे. (Mumbai news)

भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानच्या टप्पा २ अ चे काम पूर्ण झाले आहे. सध्या या मार्गिकेवर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सीएमआरएसकडून बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकासाठी सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास टप्पा २ अ च्या संचलनाचा मार्ग मोकळा होईल. येत्या दोन-तीन दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्या अानुषंगाने सीएमआरएसच्या चाचण्यांसाठी शुक्रवारी, शनिवारी एमएमआरसीने आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल केला आहे. आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रो गाड्यांची आणि इतर यंत्रणांची, प्रणालींची चाचणी करण्यासाठी शुक्रवार, शनिवारी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (Mumbai Metro 3)

एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आरे ते बीकेसी मार्गिकेवरील सेवा रात्री १०.३० ऐवजी रात्री ९.३० या वेळेत सुरू राहणार आहे. रात्रीच्या वेळेस एका तासाने सेवा कालावधी कमी करण्यात आला आहे, तर शनिवारी सेवा रात्री १०.३० ऐवजी रात्री ९.३० या वेळेत सुरू राहणार आहे. शनिवारी सेवा कालावधी सकाळी एका तासाने तर रात्री एका तासाने कमी करण्यात आला आहे. तेव्हा प्रवाशांनी याची नोंद घेत या वेळेत प्रवासासाठी इतर पर्यायांचा वापर करावा असे आवाहन एमएमआरसीकडून केले आहे.

मूळ वेळापत्रक

सोमवार ते शनिवार -सकाळी ६.३० ते १०.३०रविवार-सकाळी ८.३० ते १०.३०

वेळापत्रकातील बदल असा

शुक्रवार -सकाळी ६.३० ते ९.३० ( सेवा कालावधी एका तासाने कमी) शनिवार-सकाळी ७.३० ते रात्री ९.३० (सेवा कालावधी सकाळी एका तासाने तर रात्री एका तासाने कमी)रविवारच्या वेळापत्रकात सध्या तरी कोणताही बदल नाही.
Comments
Add Comment