Thursday, September 18, 2025

‘साबर बोंडं’ हा मैलाचा दगड ठरेल

‘साबर बोंडं’ हा मैलाचा दगड ठरेल

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल 

जयश्री जगताप या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर या क्षेत्रात आपलं अस्तित्व प्रस्थापितं केलं आहे. जिगीषा व अष्टविनायक निर्मित ‘भूमिका’ या नाटकामध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

नागपूर जिल्ह्यातील निवळी गावात तिचे शालेय शिक्षण झाले. तिथे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला. मुरुड येथील संभाजी कॉलेजमध्ये तीच शिक्षण झाले. पुढे युथ फेस्टिवलमध्ये तिने अनेक एकांकिकेमध्ये काम केले. नंतर तिने एम. ए. बी. एड. केलं आणि बी.एड. कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम केले. नंतर तिचे अभिनेते उमेश जगतापशी लग्न झालं. मुंबईला आल्यावर तिला प्रश्न पडला की, काम करायचं की अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करायचं. तिने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करायचे ठरविले.

आविष्कार संस्थेत तिने अभिनयाच्या कार्यशाळेत काम केलं. त्यानंतर माऊली, बंदीशाळा, सोयरिक या चित्रपटामध्ये काम केले. कोरोनाचे आगमन झाले. युगंधर देशपांडेनी कोरोना थिएटर सुरू केलं होतं. त्यामध्ये तिने तिचे व्हीडिओ व अभिवाचन पाठविले. ते पाहून तिला ‘साबर बोंडं’ हा चित्रपट मिळाला. त्यामध्ये आईची भूमिका तिने केली होती. आई व मुलाचे भावनिक बंध त्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुमन हे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव होते. परदेशात या चित्रपटाला ग्रँड ज्युरी अॅवॉर्ड मिळाले. या चित्रपटाच्या निमित्ताने तिची अमेरिकावारी देखील झाली. या चित्रपटाचे अमेरिकेत स्क्रिनिंग झाले. हा चित्रपट व अभिनेते उमेश जगताप यांच्याशी झालेलं लग्न हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. हा चित्रपट अजून रिलीज झाला नाही. हा चित्रपट मैलाचा दगड ठरेल. त्यानंतर तिचं आयुष्य बदलत गेलं.

तिला भरपूर कामे मिळू लागली. सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत तिने जोगतीण साकारली होती. आई तुळजाभवानी या मालिकेत देखील तिने काम केले. दगड आणि माती या प्रायोगिक नाटकात तिने काम केले. खरंतर या नाटकातील तिचे काम पाहून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीनी तिला भूमिका या नाटकातील व्यक्तिरेखेविषयी विचारले होते. कालसूत्र, पेट पुराण या वेबसीरिजमध्ये देखील तिने काम केले आहे.

भूमिका या नाटकात तिची मोलकरणीची भूमिका आहे. तिचं काहीतरी म्हणणं असतं, तिच्या बोलण्यामुळे इतरांच्या विचारांमध्ये बदल होतो.

हे नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक काही ना काही विचार घरी घेऊन जातील. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सोबत काम करताना भरपूर गोष्टी ती शिकली. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे खूप अभ्यासू, शिस्तप्रिय आहेत व मोठ्या प्रेमाने त्यांनी हे नाटक बसवले असल्याचे तिने स्पष्ट केले. सचिन खेडेकर, समिधा गुरू, जाई, अतुल या साऱ्यांसोबत काम करताना भरपूर शिकायला मिळते. सचिनजींनी तिला संवादाविषयी व हालचालींविषयी मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment