Tuesday, September 16, 2025

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्ट तिकीट खिडकी

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्ट तिकीट खिडकी

मुंबई : मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रेल्वेकडून अनेक सुविधा दिल्या जातात, मात्र वाढत्या गर्दीमुळे अनेकदा या सुविधा कमी पडतात. रेल्वेतून प्रवास करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या तिकीटासाठी भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागतात. मात्र मागील काही वर्षात रेल्वेने सुरुवातीला स्मार्ट कार्ड, नंतर यूपीआयद्वारे मशीनद्वारे तिकीट काढणं, त्यानंतर स्मार्टफोनमधील अॅप यूटीएसवरुन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली.

मात्र तरीही रेल्वे स्थानकांवर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांचा रांगा लागलेल्या असतात. यासाठीच आता रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी सुविधा आणली आहे. पश्चिम रेल्वे स्थानकांवर रेल्वेकडून 'स्मार्ट तिकीट खिडकी' सुरू करण्यात आली आहे. या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीटासाठी असलेल्या रांगापासून काहीसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

काय आहे स्मार्ट तिकीट खिडकी?

पश्चिम रेल्वे स्थानकांत स्मार्ट तिकीट खिडकी ही नवी सुविधा सुरू झाली आहे. या सुविधेमुळे तिकीट काढताना ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सध्या एकाच तिकीट खिडकीवर रोख रक्कम देऊन तिकीट काढणारे आणि ऑनलाईनद्वारे पैसे भरुन तिकीट काढणारे अशा दोन्ही प्रकारचे प्रवासी एकाच रांगेत तिकीट काढण्यासाठी उभे असतात. मात्र आता स्मार्ट तिकीट खिडकी या सुविधेमुळे जे प्रवासी ऑनलाईन पेमेंट करणार असतील ते या स्मार्ट तिकीटवर खिडकीवरुन तिकीट काढू शकतात.

आतापर्यंत ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांसाठीही आणि पैसे देऊन तिकीट काढणाऱ्यांसाठी एकच तिकीट खिडकी होती. मात्र आता स्मार्ट खिडकीमुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी वेगळी रांग असेल. रोख रक्कम देऊन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्याच रांगेत उभं न राहता या वेगळ्या सुरू केलेल्या स्मार्ट खिडकीवर ऑनलाईनद्वारे तिकीट काढता येईल. याद्वारे प्रवाशांना कॅशलेस व्यवहार करता येईल. यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांसह रोख रक्कम देणाऱ्या अशा दोन्ही रांगेतील प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment