Monday, September 15, 2025

शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे : आ. किरण लहामटे

शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे : आ. किरण लहामटे

राज्य शासनाने प्रस्ताव सादर करण्याची मागणी

अकोले : अकोले अकोले तालुक्याला रेल्वे च्या नकाशावर आणणाऱ्या शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी आ.डॉ किरण लहामटे (kiran lahamate) यांनी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

अकोले तालुक्याला रेल्वेने देशाच्या अन्य भागाशी जोडण्यासाठी शहापूर (जी ठाणे) डोळखांब, भंडारदरा, अकोले, संगमनेर, शिर्डी, साईनगर असा रेल्वे मार्ग व्हावा अशी तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे.राज्यात जे नवीन रेल्वे मार्ग होतात त्याचा निम्मा खर्च राज्य शासन करीत असते. त्या मुळे रेल्वे कडे राज्य शासना मार्फत प्रस्ताव जाणे गरजेचे असते.

आमदार डॉ लहामटे यांनी या संदर्भात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.व त्यांच्याकडे सर्वेक्षण होणेसाठी राज्य शासनाने रेल्वे कडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी पत्राद्वारे केली.मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांना या बाबत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.मध्य रेल्वे वरील आसनगाव (शहापुर) ते साईनगर शिर्डी असा रेल्वे मार्ग झाल्यास अकोले तालुका थेट मुंबई शी रेल्वेने जोडला जाणार आहे .अकोले तालुक्यात मोठया प्रमाणात भाजीपाला पिके घेतली जातात.मोठया प्रमाणात दूध उत्पादनही होते.असा मार्ग झाल्यास भाजीपाला,फुल,अन्य शेतीमाल,दूध याना मुंबई ची बाजार पेठ उपलब्ध होईल.हा नाशवंत माल वेळेत मुंबईला पोहचेल.

तालुक्याच्या पश्चिम भागात भंडारदरा धरण ,सांदण दरी, कळसुबाई, हरिसचंद्रगड, रतनगड या सारखे गडकिल्ले, पुरातन मंदिरे अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. दर वर्षी हजारो पर्यटक येथे येत असतात. त्यात मुंबई,ठाणे परिसरातील पर्यटकांची संख्या मोठी असते. रेल्वे झाल्यास पार्टकांची संख्या वाढेल. शिर्डीला येणारे अनेक पार्टकही तालुक्यात सहजपणे येऊ शकतील. पर्यटन उद्योग वाढून व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. व्यापारी, व्यावसायिक याना एकाच दिवसात मुंबईला जाऊन परतणे शक्य होणार आहे. या आदिवासी तालुक्याच्या विकासासाठी असा रेल्वे मार्ग महत्वाचा ठरणार आहे.मुख्यमंत्री याना दिलेल्या पत्रात या रेल्वे मार्गाचे महत्व व त्याची आवश्यकता डॉ लहामटे यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

मध्य रेल्वे वरील आसनगाव स्थानकातुन हा मार्ग सुरू होईल.शहापूर,अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातून हा मार्ग जाणार आहे.तसेच असा मार्ग झाल्यास कसारा घाटालाही एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.उपमुखमंत्री अजित पवार यांच्याकडेही अशीच मागणी करण्यात आली आहे.पुणे नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात कोणताही बदल करू नये.मूळ मार्गच कायम ठेवावा अशी मागणीही त्यांनी उपमुख्यमंत्यांकडे केली आहे.पुणे नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात अकोले तालुक्यातील देवठाण येथे स्टेशन होते.मात्र बदललेल्या आराखड्यात देवठाण स्टेशन नाही. ते कायम ठेवावे अशी मागणीही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी रेल्वे च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या तसेच परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांही भेट घेतल्या.

Comments
Add Comment