Sunday, September 14, 2025

Metro : मेट्रो पर्यवेक्षकाकडून २० लाखांच्या लोखंडाची चोरी!

Metro : मेट्रो पर्यवेक्षकाकडून २० लाखांच्या लोखंडाची चोरी!

पुणे : मेट्रोच्या (Metro) पर्यवेक्षकाने एका ट्रक चालकासोबत संगनमत करून मेट्रोच्या प्रकल्पावरील २० लाखांचे लोखंड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १० सप्टेंबर २०२४ ते २५ जानेवारी २०२५ या कालावधीत भक्ती-शक्ती ते खंडोबा माळ चौक या दरम्यानच्या मेट्रो मार्गावर घडली. याप्रकरणी पर्यवेक्षक हरिश्चंद्र सुनील कुमार (रा. निगडी), ट्रक चालक महंमद अनिब पटेल (रा. मोशी) या दोघांना अटक केली आहे. याबाबत रवि रेडियार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते निगडी या दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामावरील साहित्यावर लक्ष ठेवण्यासाठी मेट्रोने रेडियार यांच्या संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेने हरिश्चंद्र याला पर्यवेक्षक म्हणून नेमले आहे. हरिश्चंद्र याने ट्रक चालक महंमद याच्यासोबत संगनमत केले. दोघांनी निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते खंडोबा माळ चौक या दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पावरून २० लाख रुपये किमतीचे ४० टन लोखंड चोरी केले. मेट्रोच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Comments
Add Comment