Thursday, October 30, 2025
Happy Diwali

पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई: राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. शपथविधीच्या निमित्ताने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. त्या दरम्यान भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. भेटीदरम्यान मराठवाड्यातील दुष्काळ, बेरोजगारी आणि स्थलांतरित कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली.

त्यानंतर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांच्याशी मराठवाड्यातील दुष्काळ निर्मूलन आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास भाग आणि स्थलांतरित कामगारांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे भाजपाच्या तिकिटावर बीडमधून लढल्या होत्या. मात्र, त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार) बजरंग सोनावणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पंकजा यांना भाजपाने संधी दिली आणि साडेचार वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा विधिमंडळात परतल्या. अशात यापूर्वीही मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा मंत्री होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment