
नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड
यासद्गृहस्थांनी माझा पासपोर्ट घेतलाय हो.” तिचा आवाज भरला होता. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. गळ्यात हुंदका दाटून बाहेर आला. “सहज बघायला म्हणून मागितला नि आता... आता? देत नाही म्हणतो.” ती चक्क रडायला लागली. गर्दी तिच्या बाजूची झाली. “अहो, मी हिचं तिकीट काढलंय.” तो गृहस्थ दमात होता. “का काढलंत?”
“म्हणजे काय? कंत्राटी काम करणार ना तू?” “परस्त्रीला अगंतुगं करता?” “मग कामवालीला कुणी अहोजाहो करतं?” “कोण म्हणालं, मी कामवाली आहे म्हणून?” “मग जाहिरातीला रिस्पॉन्स कशाला दिला?” “मॅडम, इतना मराठी हमको समझता नही.” गर्दी म्हणाली. “समझनाच पडेगा.” “अरे, रीतसर जाहिरात दिली. मुलाखती घेतल्या.” “मी कुठे नाही म्हणतेय.” “मग?”
“हे पहा, यांनी जाहिरात दिली. परदेशात एक लाख नव्वद हजाराची नोकरी. खाना-पीना, चाय बिस्कुट, नाश्ता-पानी सब फुकट. चार सारीज... सब फुकट. कोणीही खूश होईल अगदी अशी होती. शिवाय डॉक्टर जोडपे. दोघांचा तर स्वयंपाक. मी इथल्या तीन मुलांचं नि व्यसनी नवऱ्याचं करून विटले होते हो.” बाई हुंदके देऊ लागली. जमाव ताबडतोब बाईच्या बाजूचा झाला. तिच्या पुढ्यात झुकला.
“अहो, मी बीए. एम. ए. केलंय हो. पण बेक्कार, गरीबडं महाविद्यालय मिळालंय. पंचवीस हजार जेमतेम देतात. हल्ली महागाई किती वाढली आहे. तीन वेळा खायलाही पुरत नाहीत.” “नवरे काही करीत नाहीत का?” कोणीतरी आगाऊ प्रश्न केला. “ सांगितलं ना? दुखी औरत तेरी कहानी, पेट मे भूख और आँख में पानी.” टपटप अश्रू गालांवर धावले. “मुकाट्यानं त्यांचा पासपोर्ट त्यांना परत करा.” “कसा देत नाही? मी पण बघते.” एक झाशीची राणी म्हणाली. “हे बघा, पासपोर्ट माझ्याकडे राहिला काय नि हिच्याकडे तो असला काय, दोघे अमेरिकेतच जाणार.” “मग द्या बघू मुकाट. नाही तर पायलटकडे तक्रार करू आम्ही सगळेजण.” “त्याने काय होणार?” “तो विमान उतरवू शकतो. दु:खासह काळात डोंगराळ भागात तुम्हाला सोडून जाऊ शकतो आम्ही सारे.” “असं करता येतं?” “अलबत्.” गर्दीतलं कोणीतरी मोठ्यांदा म्हणालं. तो गडबडला. “बरं मग, घे तुझा पासपोर्ट.” त्याने दस्ताऐवज परत केला. “थँक्यू व्हेरी मच.” ती राग विसरून म्हणाली.
आता पासपोर्ट व्यवस्थित ज्या व्यक्तीचा त्या व्यक्तीस मिळाला होता. गर्दी कृतकृत्य होऊन आपापल्या जागी बसली. “मला किनई, माझी सीट बदलायची आहे.” ती म्हणाली. सरळ दुसऱ्या सीटवर बसली. गर्दी तिच्या बाजूची होती ना! वास्तविक ती कामावर ‘त्याच्या’च कडे नोकरीला होती. पण जमाना झुकता है! झुकानेवाला चाहिये. नंतर त्यांच्या लक्षात आलं, की कोणताही लेखी करार आपण केला नव्हता. ‘वापरता आली तर वापरू’ असा दुष्ट विचारही त्यामागे होता. भारत नि अमेरिका कोसो दूर होते. कुणाला पत्ता देखील लागला नसता. सोळा तास मधे गेले. गर्दीचं मानसशास्त्र अजब गजब असतं. आपल्यातच दंग होऊन जातं. जणू काही मधे घडलंच नव्हतं. कॅलिफोर्निया येताच जो तो आपलं लगेज घेण्यात गुंतला. ‘ती’ मागे पडली. आपल्याला घेण्यासाठी एअरपोर्टवर कोण आलंय हे बघण्यासाठी प्रवाशांची लगबग उडाली.
ती ही जागची उठली.‘कुठे निघालीस?’ ‘समजेल’ ती जोरात म्हणाली. पासपोर्ट तिच्या हातात होता. तो नरमला. ती पुढे पुढे नि तो तिच्या मागे चालू लागला. “आपल्याला एक छोटी फ्लाईट घ्यायची आहे.” “ती तर आपल्याला नव्हे, तुम्हाला घ्यायची आहे.” “म्हणजे?” “समजेल लवकरच.” ती स्मितहास्य करीत म्हणाली. “म्हणजे?” “म्हणजे म्हणजे, वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, मैत्रिणीचा मान, बघावा छान!” विमानातून तो पॅसेजमधून तिच्या मागे मागे जाऊ लागला. “हरीशऽऽ“ तिने एका पाठमोऱ्या रुबाबदार युवकाला हाकारलं. “ओऽऽ माय लव.” ती त्याच्या मिठीत शिरली. “हे बघ... यांनी माझं तिकिट काढलं.” तिनं बघितलं, तर ते दोघं हाय हॅलो करत एकमेकांस भेटले. आपण गंडलो पार! त्यानं ते मुकाट स्वीकारलं.