Friday, October 31, 2025
Happy Diwali

'जागतिक रंगकर्मी दिवस'...!

'जागतिक रंगकर्मी दिवस'...!

राज चिंचणकर

काहीही झाले तरी नाटकाचा पडदा ठरलेल्या वेळी उघडला जाणारच, अशी ख्याती असलेल्या 'ललितकलादर्श' या नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा, नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या स्मृती कायम ठेवण्याचे मोठे कार्य सध्या 'मराठी नाट्य कलाकार संघ' करत आहे. २५ नोव्हेंबर या दिवशी येणाऱ्या भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून, त्यांच्याच हयातीत मराठी नाट्य कलाकार संघाने 'जागतिक रंगकर्मी दिवस' या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आणि आता भालचंद्र पेंढारकर यांच्या पश्चात गेली १० वर्षे ही प्रथा अखंड सुरु आहे. विशेष म्हणजे, हा 'जागतिक रंगकर्मी दिवस' जेव्हा पहिल्यांदा साजरा केला गेला; तेव्हा साक्षात भालचंद्र पेंढारकर त्या सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या वयोमानानुसार, व्हीलचेअरवर बसून रंगमंचावर त्यांनी घेतलेली 'एन्ट्री' समस्त नाट्यसृष्टीच्या स्मरणात राहिली आहे. प्रकृती पूर्णतः साथ देत नसतानाही त्यांनी त्यावेळी खड्या आवाजात म्हटलेल्या नांदीचे सूरही अनेकांच्या कानांत आजही रुंजी घालत आहेत. रंगभूमीसाठी सर्वस्व वाहिलेल्या अशा श्रेष्ठ रंगकर्मीच्या नावाने मराठी नाट्य कलाकार संघाने 'जागतिक रंगकर्मी दिवस' ही सुरु केलेली प्रथा स्तुत्यच म्हणावी लागेल.

रंगभूमीवरच्या कलाकारांसाठी हक्काचा असा एक दिवस असावा, हा हेतू या संकल्पनेच्या मागे आहे. मराठी नाट्य कलाकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कबरे यांच्या संकल्पनेतून हे सर्व साकार होत आले आहे. मराठी रंगभूमीवर अमूल्य योगदान दिलेल्या ज्येष्ठ रंगकर्मीचा या दिवशी सन्मान करण्यात येतो. यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना मराठी नाट्य कलाकार संघाचा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला असून, २५ नोव्हेंबर रोजी आयोजित सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ज्या कलाकारांनी रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा केली आहे; अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मींची निवड यात सन्मानमूर्ती म्हणून केली जाते.

मराठी नाट्य कलाकार संघाने यापूर्वी सन्मानित केलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींच्या नावांवर दृष्टीक्षेप टाकल्यावर त्यांच्या निवडीचेही कौतुक करावे लागेल. भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान, शोभा प्रधान, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी व रोहिणी हट्टंगडी या ज्येष्ठ रंगकर्मींना आतापर्यंत मराठी नाट्य कलाकार संघातर्फे सन्मानित केले गेले आहे. यंदा मोहन जोशी यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे आणि रंगकर्मी म्हणून त्यांचे एकूणच योगदान लक्षात घेता, हा पुरस्कार योग्य रंगकर्मीला मिळत असल्याचे सूर नाट्यसृष्टीत उमटत आहेत.

Comments
Add Comment