‘कुलाबा - वांद्रे - सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरून प्रवास करण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार
मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो ३’वरील १२.६ किमी लांबीच्या आरे – बीकेसी टप्प्याच्या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसांत मुंबई मेट्रो रेल कॅार्पोरेशनला (‘एमएमआरसी’) सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यासाठी ‘एमएमआरसी’ला पंतप्रधान कार्यालयाकडून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील तीन तारखा देण्यात आल्या आहेत. लवकरच यापैकी एक दिवस निश्चित करून आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. एकूणच दसऱ्यापूर्वी भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (‘एमएमआरडीए’) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ’ या ३२.५ किमीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम ‘एमएमआरसी’ करीत आहे. कारशेडचा वाद आणि अन्य काही तांत्रिक कारणांमुळे ही मार्गिका रखडली आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी या १२.६ किमी लांबीच्या टप्प्यातील मार्गिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि अंतिम प्रक्रियेस ‘एमएमआरसी’ने सुरुवात केली आहे.
मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची ही प्रक्रिया असून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करता येणार आहे. दरम्यान, सुरक्षा प्रमाणपत्र प्रक्रियेस विलंब झाल्याने ‘मेट्रो ३’च्या पहिल्या टप्प्याची प्रतीक्षा लांबली होती. आता डब्यांची, मेट्रो गाड्यांची, रुळांची (रोलिंग स्टाॅक) चाचणी ‘सीएमआरएस’ने पूर्ण केल्याची माहिती ‘एमएमआरसी’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आता मेट्रो मार्गिका, स्थानकांतील उद्वाहक, इतर सुविधा, विविध यंत्रणांची चाचणी करण्यात येणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच हे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई - पुणे मार्गिकेचेही लोकार्पण होण्याची शक्यता
‘मेट्रो ३’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी ‘एमएमआरसी’ने नुकतीच पंतप्रधान कार्यालयाकडे वेळ मागितली होती. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील तीन तारखा कळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ३, ४ आणि ५ ऑक्टोबर या तारखा देण्यात आल्याचे समजते. त्यापैकी ४ ऑक्टोबर ही तारीख निश्चित होण्याची शक्यता अधिक आहे. ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (‘एमएसआरडीसी’) ठाणे खाडी पूल – ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील, मुंबई – पुणे मार्गिकेचेही लोकार्पण होण्याचीही शक्यता आहे.
‘सीएमआरएस’ चाचण्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मेट्रो गाड्या, डब्बे, रुळांची सीएमआरएस चाचणी पूर्ण झाली आहे. आता इतर सुविधा, यंत्रणांच्या ‘सीएमआरएस’ चाचणीसाठी ‘सीएमआरएस’ला आमंत्रित केले जाणार आहे. ही चाचणी पूर्ण होऊन सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर टप्पा – १ वाहतूक सेवेत दाखल केला जाईल. – अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, ‘एमएमआरसी’






