Saturday, September 13, 2025

अबू सालेम ३ जुलैपर्यंत तळोजा कारागृहातच राहणार

अबू सालेम ३ जुलैपर्यंत तळोजा कारागृहातच राहणार

अन्य कारागृहात न हलवण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली

मुंबई : जीवाला धोका असल्याने आपल्याला तळोजा कारागृहातून अन्यत्र हलवू नये, अशी मागणी करणारा मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड अबू सालेम याचा विशेष न्यायालयात फेटाळला. विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी सालेम याचा हा अर्ज फेटाळून लावला. त्याचवेळी, ३ जुलैपर्यंत सालेमला अन्य कारागृहात हलविण्यात येऊ नये, असे आदेश विशेष न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले.

तळोजा मध्यवर्ती कारागृहात सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. कारागृहातील अतिसुरक्षित अंडा सेलच्या दुरुस्तीचे काम आवश्यक असून दुरुस्तीदरम्यान अंडा सेलमधील आरोपींना इतरत्र हलवण्याची गरज असल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.

मात्र, सालेमच्या जीवाला धोका असून याआधीही त्याच्यावर दोनवेळा हल्ला झाल्याकडे सालेमच्या वकिलांनी सुनावणीच्या वेळी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. तसेच, सालेमची रवानगी अन्य तुरुंगात करू नये, अशी मागणीही केली होती.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सालेमच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. विशेष न्यायालयाने सालेमच्या अर्जावर निर्णय देताना तो फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment