सरत्या आठवड्यामध्ये अनेक लक्षवेधी अर्थवार्ता समोर आल्या. देशातल्या सर्वात जुन्या कॉर्पोरेट घराण्यात ‘भाऊबंदकी’ या काळात समोर आली. दरम्यान भारतातील डीमॅट खात्यांची संख्या १५ कोटींवर गेल्याची माहिती समोर आली. याच सुमारास टाटा मोटर्स तामिळनाडूमध्ये जग्वार लँडरोव्हरची निर्मिती करणार असल्याची बातमी झळकली ,तर जगप्रसिध्द तोशिबामध्ये कामगारकपातीचे संकट समोर आले.
अर्थनगरीतून...महेश देशपांडे
आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
देशातील जुन्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबातील दोन गटांनी आता एकमेकांच्या कंपन्यांच्या संचालकपदांचे राजीनामे दिले आहेत. गोदरेज कुटुंबाने एक शतकाहून अधिक काळापूर्वी स्थापन केलेल्या आपल्या विशाल समूहाचे औपचारिक विभाजन करण्यास सुरुवात केली आहे. आता ते लवकरच एकमेकांच्या कंपन्यांमधील शेअर्स विकणार आहेत. या दिशेने वाटचाल करत, या वर्षाच्या सुरुवातीला आदी आणि नादीर गोदरेज यांनी गोदरेज आणि बॉयसच्या बोर्डाचा राजीनामा दिला, तर जमशेद गोदरेज यांनी जीसीपीएल आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या बोर्डवरील आपली जागा सोडली. कुटुंबाच्या दोन शाखांमध्ये ही विभागणी होत आहे. एका बाजूला आदी गोदरेज आणि भाऊ नादीर गोदरेज तर दुसरीकडे त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज आणि त्यांची बहीण स्मिता गोदरेज कृष्णा आहेत.
‘गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएट्स’चे नेतृत्व आदी गोदरेज आणि त्यांचे बंधू करतात. जमशेद गोदरेज आणि त्यांची बहीण ‘गोदरेज अँड बॉयस’चे प्रमुख आहेत. आदी नादीर ‘गोदरेज अँड बॉयस’मधील आपला हिस्सा दुसऱ्या शाखेला विकणार आहे. जमशेद गोदरेज आणि त्यांचे कुटुंबीय ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स’ आणि गोदरेज प्रॉपर्टीजमधील हिस्सा त्यांच्या चुलत भावांना हस्तांतरित करतील. या प्रकरणाशी परिचित लोकांच्या म्हणण्यानुसार ‘गोदरेज आणि बॉइस’च्या अंतर्गत अंदाजे ३,४०० कोटी रुपयांची रिअल इस्टेट मालमत्ता जाईल. मालकी हक्क नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र करार केला जाईल. गोदरेज ग्रुपमध्ये जीसीपीएल, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज अॅग्रोव्हेट आणि एस्टेक लाईफसायन्सेस या पाच सूचिबद्ध कंपन्यांचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारी बाजार बंद होत असताना, त्यांचे मार्केट कॅप २.३४ लाख कोटी रुपये होते. पाच सूचिबद्ध कंपन्यांनी २०२३ मध्ये सुमारे ४२ हजार १७२ कोटी रुपयांचा महसूल आणि ४ हजार ६५ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. ‘जी अँड बी’ ही खासगी मालकीची कंपनी आहे. हा समूह अभियांत्रिकी, उपकरणे, सुरक्षा उपाय, कृषी उत्पादने, रिअल इस्टेट आणि ग्राहक उत्पादनांसह विविध व्यवसाय चालवतो. तज्ज्ञांच्या मते, गोदरेज फॅमिली कौन्सिल दोन महत्त्वाच्या मुद्द्यांशी संबंधित मुख्य बारकावे शोधून काढत आहे. यामध्ये विभाजनानंतर गोदरेज ब्रँड नावाचा वापर, संभाव्य रॉयल्टी देयके आणि ‘जी अँड बी’कडे असलेल्या जमिनीचे मूल्यांकन यांचा समावेश आहे. भावी पिढ्यांसाठी मालकीचे स्पष्ट वर्णन प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने विभाग सुमारे तीन वर्षांपासून काम करत आहे. कुटुंबप्रमुख आदी आणि जमशेद गोदरेज अनुक्रमे ८२ आणि ७५ वर्षांचे आहेत.
दरम्यान भारतातील डीमॅट खात्यांची संख्या १५.१ कोटींवर पोहोचली. मार्च २०२४ मध्ये ३१ लाख नवी डीमॅट खाती उघडली गेल्यामुळे, ही वाढ झाली आहे. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज कंपनीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये दरमहा सरासरी ३.१ दशलक्ष डीमॅट खाती उघडली गेली आहेत. हा कल वर्षभर सुरू राहण्याची अपेक्षा आहे. मार्चमध्ये भारतीय बेंचमार्क निफ्टी १.५ टक्के वाढला. मजबूत मॅक्रो सिग्नल, दरकपातीच्या अपेक्षा, सतत परकीय गुंतवणूकदारांचा ओघ आणि एकूणच सकारात्मक जागतिक बाजाराचा कल यामुळे ही वाढ झाली. याशिवाय २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या विजयाच्या शक्यतेनेही गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूक करण्याची आशा निर्माण झाली आहे. ‘सीडीएसएल’ आणि ‘एनएसडीएल या दोन ‘डिपॉझिटरी सर्व्हिस प्रोव्हायडर’ (डीएसपी) पैकी ‘सीडीएसएल’ मार्केट शेअर मिळवत आहे. याचा अर्थ नवीन डिमॅट खात्यांचा मोठा भाग ‘सीडीएसएल’सोबत उघडला जात आहे. ‘सीडीएसएल’च्या बाजारहिस्स्यात वाढ होत आहे. दुसरीकडे ‘एनएसडीएल’ने डीमॅट खात्यांची एकूण संख्या आणि जोडलेली नवी खाती या दोन्हींसाठी वर्ष दर वर्ष बाजारातील हिस्सा गमावला आहे. ‘एनएसई’वरील सक्रिय ग्राहकांची संख्या मार्च २०२४ मध्ये महिना दर महिना १.८ टक्क्यांनी वाढून ४०.८ दशलक्ष झाली. सध्या एकूण एनएसई सक्रिय क्लायंटपैकी टॉप पाच डिस्काऊंट ब्रोकर्सचा वाटा ६३.८ टक्के आहे. मार्च २०२३ मध्ये हे प्रमाण ५९.९ टक्के होते.
आता उद्योग विश्वावर एक नजर...
टाटा समूहाची उपकंपनी टाटा मोटर्स एक अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह तामिळनाडूमध्ये बांधलेल्या आपल्या नवीन प्लांटमध्ये जग्वार लँडरोव्हर (जेएलआर) लक्झरी कार तयार करेल. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
टाटा मोटर्सने या वर्षी मार्चमध्ये तामिळनाडूमध्ये नवीन प्लांट सुरू करण्याची घोषणा केली होती; पण लँडरोव्हरचे कोणते मॉडेल बनवणार, याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. २००८ मध्ये टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सने जग्वार लँडरोव्हर पूर्णपणे खरेदी केली होती. त्या वेळी कंपनीने फोर्ड मोटर कंपनीकडून हा स्टेक २.३ अब्ज डॉलरला खरेदी केला होता. जग्वार लँडरोव्हरची विक्री सातत्याने वाढत आहे. जग्वार लँडरोव्हर इंडिया (जेएलआर इंडिया) ने त्यांच्या लक्झरी कारच्या विक्रीचा डेटा उघड केला होता. कंपनीने २०२४च्या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. भारतातील जग्वार लँडरोव्हर कारची किरकोळ विक्री ८१ टक्क्यांनी वाढून ४,४३६ युनिट्स झाली आहे. रेंजरोव्हर आणि डिफेंडरची विक्री शंभर टक्क्यांहून अधिक वाढली. रेंज रोव्हर या ‘स्पोर्टस युटिलिटी व्हेइकल’ची किरकोळ विक्री १६० टक्क्यांनी वाढली असून, डिफेंडरच्या किरकोळ विक्रीत १२० टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा डेटा वार्षिक आधारावर जारी करण्यात आला होता. २०२४ मध्ये बाजारात आलेल्या ‘डिस्कव्हरी स्पोर्ट’ या नवीन मॉडेलच्या विक्रीत ५० टक्क्यांनी वाढ झाली असून, ‘रेंजरोव्हर इव्होक’च्या विक्रीत ५५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
जगभरातील नामांकित कंपन्यांमधील टाळेबंदीची लाट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांनी या वर्षी केलेल्या टाळेबंदीनंतर आता जपानमधील कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. टाळेबंदी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत आता तोशिबा या जपानी कंपनीचे नाव जोडले गेले आहे. याचा अनेक कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. तोशिबा सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. कंपनीच्या या कर्मचारी कपात योजनेचा देशांतर्गत बाजारावर परिणाम होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कंपनी कामावरून कमी करत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जपानमधील एकूण कर्मचाऱ्यांच्या सात टक्के इतकी आहे. २०१५ मध्येही या कंपनीमध्ये मोठी टाळेबंदी झाली.





